जलवाहिनीसाठी ९६ झाडांवर संक्रांत

जलवाहिनीसाठी ९६ झाडांवर संक्रांत

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मरोशी ते सहारदरम्यान पाण्याची मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी काही झाडांची कत्तल करावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी पूर्ण वाढलेली ९६ झाडे तोडावी लागणार आहेत. पर्यावरणवादी संघटनांनी झाडे तोडण्यास हरकत नोंदवत विरोध दर्शवला आहे.

मरोशी ते सहारदरम्यान पाण्याची मुख्य जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. या कामात येणाऱ्या प्रमुख अडथळ्यांपैकी मुख्य अडथळा हा पूर्ण वाढलेली ९६ झाडे आहेत. ती तोडण्याच्या प्रस्तावाबाबत वृक्ष अधिकारी, वृक्ष प्राधिकरण यांनी माहिती प्रसारित करून सूचना व हरकतींसाठी नोटीस जारी केलेल्या आहेत. वॉचडॉग फाउंडेशनने ही झाडे तोडण्यास विरोध केला आहे. या फाउंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले की, केवळ विद्यमान जलवाहिनी बदलण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याची गरज नाही. महापालिका प्रशासनाने पर्यावरणाची हानी कमी करणारे पर्यायी उपाय शोधणे अत्यावश्यक आहे. जलवाहिनीचा मार्ग बदलणे अथवा खंदकविरहित तंत्रज्ञान वापरणे, अशा पर्यायांचा विचार पालिका प्रशासनाने करायला हवा, असे ही पिमेंटा म्हणाले.

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे. महापालिकेने झाडे तोडण्याऐवजी झाडांच्या पुनर्रोपणाला प्राधान्य दिले पाहिजे. तथापि, मुंबईतील झाडे प्रत्यारोपणाचा निराशाजनक अनुभव पाहता, पुनर्रोपण केलेली झाडे जगण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या कमी आहे. यामुळे या निर्णयाच्या पर्यावरणीय परिणामाबद्दल खूप काळजी वाटते, असेही पिमेंटा म्हणाले.


वृक्ष प्राधिकरणाला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अन्य पर्यायांचा शोध घेण्याची विनंती करतो. पालिका प्रशासनाने या प्रकरणावर सार्वजनिक सल्लामसलत करावी. पर्यावरणाचा ऱ्हास न होता प्रकल्प कसा होईल, यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत.
- गॉडफ्रे पिमेंटा, प्रमुख, वॉचडॉग फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com