

शेअर बाजारात पुन्हा किरकोळ घसरण
आशियाई शेअर बाजारातील नकारात्मक संकेताचे परिणाम
मुंबई, ता. १८ : भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी अल्प नफा दाखवला, मात्र मंगळवारी (ता. १८) पुन्हा आपली घसरण्याची मालिका सुरू केली. यामध्ये सेन्सेक्स २९.४७ अंश, तर निफ्टी १४.२० अंश घसरला. आशियाई शेअर बाजारात नकारात्मक संकेत असल्याने भारतीय शेअर बाजारात थंडपणेच व्यवहार सुरू झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ७५,९६७.३९ अंशांवर, तर निफ्टी २२,९४५.३० अंशांवर स्थिरावला.
औषधनिर्मिती, एफएमसीजी, प्रसारमाध्यमे, सरकारी बँका, ग्राहक उपयोगी क्षेत्र यांचे शेअर अर्धा ते एक टक्का घसरले, तर आयटी, ऊर्जानिर्मिती, ऑइल अँड गॅस ही क्षेत्रे अर्धा टक्का तेजीत होती. ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक मोटर टेस्ला भारतात येणार या बातमीने महिंद्र आणि महिंद्र, अशोक लेलँड, टाटा मोटर्स हे शेअर घसरले, पण इलेक्ट्रॉनिक मोटारींना सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांचे शेअर वाढले. परदेशी वित्तसंस्थांनी गेली सलग ११ सत्रे विक्री केल्यानंतर खरेदी केली. त्यांनी ४,७८६ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. देशी वित्तसंस्थांनीही तीन हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे शेअर खरेदी केले. जागतिक बाजारात कोळशाचे भाव घसरल्यामुळे ऊर्जानिर्मिती आणि धातूनिर्मिती कंपन्यांचे शेअर आज वाढले होते.
सेन्सेक्समध्ये मंगळवारी एनटीपीसी तीन टक्के वाढला. टेक महिंद्र, झोमॅटो दोन टक्के वाढले. पॉवर ग्रिड, कोटक बँक, एचसीएल टेक एक टक्का वाढले. दुसरीकडे इंडसइंड बँक सव्वा दोन टक्के घसरला. महिंद्र आणि महिंद्र, हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरचे भाव एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरले.
..
आता अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीच्या तपशिलावर सर्वांचे लक्ष आहे. त्यांची भूमिका आक्रमक असेल, तर व्याजदर कपातीची शक्यता मंदावणार असल्याने परदेशी वित्त संस्था अजून भारतीय बाजारातून पळ काढतील, अशी भीती आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल फायनान्शियल सर्व्हिसेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.