

मालाड रेल्वे स्थानकातील
नवा फलाट मार्चमध्ये सेवेत
लोकलमधील गर्दी विभागण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा पोलादी फलाट मार्चमध्ये प्रवासी वापरासाठी खुला केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांनी ही माहिती दिली. या नव्या फलाटामुळे प्रवाशांना विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येणार आहे.
गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी मालाड स्थानकाच्या पश्चिमेला नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे. या मार्गिकेवरून रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झाली असून, गर्दी वाढली आहे. नवा फलाट तयार केल्यामुळे पूर्वीचा होम प्लॅटफॉर्म आता ‘बेट’ फलाट म्हणजेच दोन्ही बाजूंना चढता-उतरता येणार आहे. स्थानकातील गर्दीच्या नियोजनासाठी फलाट क्रमांक एकच्या पश्चिमेला हा तात्पुरता फलाट उभारण्यात येत आहे. सध्या या फलाटाचे काम अंतिम टप्प्यात असून, मार्चमध्ये तो प्रवाशांसाठी खुला होईल. नव्या फलाटाच्या सुरुवातीमुळे स्थानकावर गर्दीचे नियमन अधिक प्रभावी होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
-----
फलाटावरील पायाभूत सुविधा सुधारणार
नव्या फलाटाच्या उपलब्धतेमुळे एकाच वेळी दोन लोकल आल्यास प्रवाशांना जास्त जागा मिळणार आहे. गर्दी अधिक मोकळ्या पद्धतीने विभागली जाईल. फलाट क्रमांक एकवरील तिकीट आरक्षण केंद्र व अन्य अनावश्यक बांधकामे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लोकल फेऱ्यांच्या वेळेत काही मिनिटांचा बदल करून गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे. सध्या काम सुरू असल्याने या नव्या फलाटाचा वापर करणे टाळावे, ते जीवघेणे ठरू शकते, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
मॉड्युलर फलाटांचा प्रयोग
भारतीय रेल्वेने गर्दीच्या नियोजनासाठी मॉड्युलर फलाट संकल्पना वापरण्यास सुरुवात केली आहे. ठाणे स्थानकात प्री-कास्ट बॉक्सचा वापर करून क्रेनच्या मदतीने फलाट उभारणी करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी ठरला असून, भारतीय रेल्वेवरील पहिला मॉड्युलर फलाट ठाणे स्थानकात उभारण्यात आला होता. मालाड स्थानकातील पोलादी फलाटाची संकल्पनाही याच प्रयोगावर आधारित असून, भविष्यात गर्दीच्या नियोजनासाठी असे उपाय मोठ्या प्रमाणावर राबवले जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.