

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता १९ : शहरातील अवजड वाहने वेळ मर्यादेचे पालन करीत नाहीत. परिणामी प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडी होते. गेल्यावर्षी अवजड वाहनांविरोधात ९३ हजार चलान आणि पाच कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. असे असतानाही वाहनचालक सुधारत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळी आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली आहे. असे असतानाही ही वाहने शहरात बंदीच्या काळात फिरताना दिसतात. नियमांचे उल्लंघन होऊनही त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ बंदीकाळात वाहने येत नाहीत, तर ओव्हरलोड वाहनांचीही वाहतूक सुरू असते. सकाळ, संध्याकाळ कोंडी होत असल्याने नोकरदारांना कार्यालय आणि घरी जाण्यास नेहमी उशीर होतो. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत अवजड वाहतुकीमुळे वाहनांच्या रांगा लागतात. त्याचा नागरिकांना त्रास होतो. संबंधित वाहनांची नोंदणी रद्द करण्याबाबत शिफारस केली जाणार आहे. परंतु त्याऐवजी ही वाहने बंदीच्या वेळी प्रवेशच करणार नाहीत, यावर भर देणे गरजेचे आहे.
- प्रदीप वाघमारे, सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य), महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
मुंबईत अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे; तरीही काही वाहनचालक नियमांचे पालन करीत नाहीत, अशा वाहनांची नोंदणी रद्द करावी, अशी शिफारस परिवहन विभागाला केली जाणार आहे.
- एम. रामकुमार, अपर पोलिस आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.