

पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे पालिकेचा भर
नवीन पाइपलाइन, जुन्या वाहिन्यांची डागडुजी करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : पाण्याची गुणवत्ता आणि वितरण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी जलअभियंता विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत अभय योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अभय योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून जल जोडणीधारकांनी थकीत रक्कमेचे अधिदान केल्यास, अतिरिक्त आकारात सूट देण्यात येत आहे. १ एप्रिल २०२३ ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत १२ हजार ५०५ जलजोडणीधारकांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यांना ५६.९७ कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे.
जल विभागाने सर्वांसाठी पाणी धोरण आखत जून २०२२ पासून झोपडपट्ट्या, अनधिकृत बिगर झोपडपट्टी बांधकामे आणि गावठाण, कोळीवाड्यातील रहिवाशांना पाणीपुरवठा मंजूर करण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी’ हे एक सर्वसमावेशक धोरण अमलात आणले आहे. या धोरणांतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे १५ हजार ३७५ परवानगी पत्र देण्यात आली असून त्यापैकी सात हजार ८६८ नवीन जलजोडण्या देण्यात आल्या आहेत.
जलाशयांच्या संरचनात्मक दुरुस्तीवर भर देण्यात येत असून तज्ज्ञ सल्लागारांच्या शिफारशींनुसार संरचनात्मक दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार भांडुप जलाशयाच्या दोन्ही कप्प्यांची व येवई जलाशयाच्या एका कप्प्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या कप्प्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच पवई आणि घाटकोपर निम्नस्तर जलाशयाचा कप्पा क्रमांक दोनच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी न करता या जलाशयाची संरचनात्मक दुरुस्ती करणे शक्य आहे का, याबाबतची तपासणी आयआयटी रुरकी या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. तसेच इतर विविध सेवाजलाशयांची निविदापूर्व कामे प्रगतिपथावर आहेत.
या कामांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ५८.७६ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. तर, पाणीपुरवठा प्रकल्प विभागासाठी २०२४-२५च्या सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजात तीन हजार ७०० कोटी आणि २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजात चार हजार कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
जल अभियंता खात्यातील प्रस्तावित कामे
- लालबहादूर शास्त्रीनगर येथे स्वतंत्र ९०० व ७५० मिमी व्यासाची जलवाहिनी पुरवण्यात येत आहे.
तरतूद : रु. १५ कोटी
- विक्रोळी पार्कसाईट, येथे २२ द.ल.लि. पाणीसाठवण क्षमता असलेल्या टाकीचे उदंचन व्यवस्थेसह काम
तरतूद : रु. २० कोटी
- के/पूर्व व के/पश्चिम विभागातील पाण्याची गळती व पाण्याचा दाब वाढविण्यासाठी महाकाली गुंफा रस्त्यालगत १,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बदलून १,५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकणे.
तरतूद : रु. ६.९४ कोटी
- मेट्रो ७ मार्गिकेमुळे बाधित झालेल्या बाण डोंगरी कांदिवली (पूर्व) ते सुधीर फडके उड्डाणपूल बोरिवली (पूर्व)पर्यंत विविध व्यासाच्या जलवाहिन्या बदलणे व टाकणे.
तरतूद : रु. १ कोटी
- एच/पूर्व विभागातील शिरसेकर मार्ग व परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा व गळती थांबविण्याकरिता १,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बदलणे.
तरतूद : रु. ६ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.