दुहेरी पदवीसाठी दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची द्वारे खुली
दुहेरी पदवीसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची द्वारे खुली
मुंबई विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात सामंजस्य करार
मुंबई, ता. २६ : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रविष्ठ होऊन एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहेत.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित नुकताच मुंबई विद्यापीठ दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत आणि कुलसचिव प्रा. विलास पाध्ये उपस्थित होते.
या करारान्वये डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ हे यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे. तर दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र हे सहयोगी संस्था म्हणून काम पाहणार आहे. डॉ. होमी भाभा विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवीच्या बीए, बीकॉम, बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांना दुहेरी पदवीसाठी प्रविष्ठ होऊ शकतील. तर पदव्युत्तर शिक्षणासाठी एमए (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, शिक्षणशास्त्र) एमकॉम (ॲडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमस्सी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र, एमएमएस आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांची निवड करू शकतील.
एखाद्या व्यक्तीला एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची आवड असेल त्याचबरोबर भाषाविषयक ज्ञानार्जन आणि संवाद कौशल्य वृद्धिंगत करावयाचे असल्यास त्या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीला सक्षम करण्याच्या गरजेवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या कराराचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.
- डॉ. रवींद्र कुलकर्णी,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
यजमान विद्यापीठ म्हणून डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या वतीने नजीकच्या काळात दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगसारख्या अनुषंगिक उद्ययोन्मुख प्रगत क्षेत्रामध्ये विविध अभ्यासक्रम तयार करून दिले जातील. दुहेरी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल.
- डॉ. राजनीश कामत,
कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

