‘जेजे’त बिपाल डोस!
‘जे. जे.’त बिपाल डोस!
एमडीआर टीबी रुग्णांवर उपचार सुरू; रोग पूर्णतः बरा होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : एमडीआर टीबी रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचे ठरणाऱ्या ‘बिपाल’ औषधाचा डोस देण्यास मुंबईत सुरुवात झाली आहे. जे. जे. रुग्णालयाच्या टीबी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये नोंदणीकृत ११ एमडीआर रुग्णांना बिपालचा डोस देण्यात आला. त्यामुळे जे. जे. हे बिपालचा डोस देणारे राज्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे, तर पुढील महिन्यापासून राज्यभरातील एमडीआर रुग्णांना बिपाल औषधाचा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे आता सहा महिने औषध घेऊन टीबी रुग्ण पूर्णतः बरा होऊ शकणार आहे.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत संपूर्ण देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बिपालची मदत मिळणार आहे. टीबी तज्ज्ञांच्या मते, क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण एमडीआरचे असतात.
-----------------------------------
सुरुवात मुंबईपासून
यामध्ये या मल्टी ड्रग रेझिस्टंटमध्ये रुग्णांवर टीबीच्या काही औषधांचा परिणाम होत नाही. या रुग्णांना किमान २० ते २४ महिने औषधे घ्यावी लागतात, तर सहा महिने इंजेक्शन्स घ्यावी लागतात. हा दीर्घ डोस कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बिपालला मान्यता दिली होती, त्याची सुरुवात जे. जे. रुग्णालयापासून करण्यात आली आहे.
------------------------------
राज्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाले असल्याचे राज्य क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या टीबी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये नोंदणी केलेल्या ११ एमडीआर रुग्णांवर ''बिपाल''चा डोस देण्यात येत असून, हे सर्व रुग्ण १४ वर्षांवरील आहेत.
--------------------------
पुढील महिन्यापासून राज्यभरातील लहानग्यांना बिपाल-
डॉ. सापळे यांनी सांगितले की, जे. जे. रुग्णलयात टीबीसाठी दोन केंद्रे असून, त्यापैकी एक टीबीग्रस्त मुलांसाठी आहे. आता राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एमडीआर टीबीने त्रस्त असलेल्या मुलांना मार्चपासून बिपाल डोस देण्यात येणार आहे.
---------------------------
आता १० ऐवजी चार औषधे
बिपाल ही एक बहुप्रतीक्षित उपचार प्रणाली आहे, जी अनेक देशांमध्ये सुरू आहे. तीन वर्षे चाललेल्या या चाचणीत रुग्णांवर ९० टक्के सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यानंतर भारतातही ते सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. याआधी एमडीआर रुग्णांना दररोज १० पेक्षा जास्त औषधे घ्यावी लागत होती, मात्र आता त्यांना फक्त चार औषधांचा कॉम्बो पॅक बिपाल घ्यावा लागतो.
---------------------
दोन रुग्णालयांमध्ये १०० रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. आयसीएमआरच्या सूचनेनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबईतील पालिकेच्या गोवंडीतील शताब्दी आणि घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयात १०० रुग्णांवर क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. सहा महिने औषधे दिल्यानंतर दोन वर्षे या रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले. यानंतर सर्व रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम आढळल्यानंतर बिपाल सुरू करण्याची शिफारस करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

