मोटार वाहन विभागात रडार खरेदीत भ्रष्टाचार?

मोटार वाहन विभागात रडार खरेदीत भ्रष्टाचार?
Published on

मोटार वाहन विभागात रडार खरेदीत भ्रष्टाचार?
उपप्रादेशिक अधिकाऱ्याची परिवहनमंत्र्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : परिवहन विभागाच्या ६९ इंटरसेप्टर वाहनांसाठी रडार खरेदीमध्ये घोटाळा झाला असून त्यामध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया राबविताना परिवहन आयुक्त, सहपरिवहन आयुक्त यांनी भ्रष्टाचार केला आहे, असा गंभीर आरोप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी केला असून त्याची तक्रार परिवहनमंत्र्याकडे केली आहे.

खडसे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की या कामकाजाशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करणाऱ्या एजन्सीज केंद्र शासनाच्या जेम पोर्टलवर उपलब्ध असतानादेखील ई-निविदा करून एका विशिष्ट कंपनीला व व्यक्तींच्या समूहाला फायदा व्हावा, यासाठी अप्रमाणिक हेतूने बेकायदा कार्यादेश देण्यात आला आहे. खडसे पुढे म्हणाले, की परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, परिवहन सहआयुक्त भरत कळसकर यांनी संगनमताने या खरेदीमध्ये व्यावसायिक मक्तेदारी, लबाडी, अनुचित आर्थिक लाभाच्या फायद्यासाठी शासनाच्या जेम पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या उपकरणांची खरेदी न करता स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी एका विशिष्ट उद्योग समूहास फायदा व्हावा, याकरिता स्पर्धा अधिनियम, २००२च्या ईष्टतम स्पर्धेच्या धोरणास छेद दिला आहे. वारंवार अशा निविदा प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याने त्यांचे या प्रकरणात तत्काळ प्रभावाने निलंबन करून ‘एसआयटी’मार्फत पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी, तसेच या रडार खरेदी प्रकरणातील सर्व नस्ती, पंजिका आपल्या ताब्यात घेण्यात याव्यात, अशीही मागणी खडसे यांनी केली आहे.

एका कंपनीवर मेहेरबानी का?
तांत्रिक उपकरणांची उपलब्धता करून देणारे व या क्षेत्रात पाच वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव असणारे पुरवठादार आहेत. तसेच सहा किंवा त्यापेक्षाही जास्त राज्यात परिवहन विभागाच्या व पोलिस विभागाच्या इंटरसेप्टर वाहनांना इंटिग्रॅटेड पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचे मोबाईल ट्रॅफिक एन्फॉरसमेंट सिस्टीम सध्या खरेदी केलेल्या उपकरणांपेक्षा १/३ किमतीत उपलब्ध करून देणारे पुरवठादार जेम पोर्टलवर आहेत; परंतु अशोका बिल्डकोन लिमिटेड या कंपनीला कुठल्याही प्रकारचा पूर्वानुभव नसताना केवळ भरत कळसकर यांच्याशी जवळीक व घनिष्ठ संबंध असल्याने हे कंत्राट दिल्याचा आरोप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी केला आहे.

आमच्याकडे अधिकृत तक्रार प्राप्त नाही; मात्र वाहनांवरील मोबाईल आयटीएमएस यंत्रणा यासंबंधीची सर्व माहितीचा अहवाल यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
- भरत कळसकर, प्रभारी अपर परिवहन आयुक्त

..
रडार खरेदीबाबत तक्रारीची अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही, ती प्राप्त झाल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल. याप्रकरणी अहवाल यापूर्वीच आम्ही परिवहनमंत्र्यांना दिला आहे.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com