अपघातात भावी वधू ठार

अपघातात भावी वधू ठार

Published on

अपघातात भावी वधू ठार
दादर येथील अपघातानंतर आरोपी चालक पसार

मुंबई, ता. ४ : साखरपुडा पार पडल्यावर लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या आणि भावी आयुष्याची गुलाबी स्वप्ने रंगवणाऱ्या तरुण जोडप्यावर काळाने घाला घातला. सोमवारी (ता. ३) सायंकाळी दादर, हिंदमाता परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात भावी वधूचा जागीच मृत्यू झाला. तिचा छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहून तिचा होणारा पती जबर धक्क्यात आहे.

मूळचा कोल्हापूरचा, सध्या प्रतीक्षानगरात राहणारा संदीप कुट्टे (वय २७) आणि कांजूरमार्ग येथे राहणारी निकिता दळवी (वय २५) यांचा विवाह मे महिन्यामध्ये निश्चित झाला होता. गेल्या आठवड्यात त्यांचा साखरपुडा पार पडला. संदीप एका प्रसिद्ध टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत नोकरी करतो. तर निकिता एका टेक्सटाईल कंपनीच्या लोअर परळ येथील कार्यालयात कार्यरत होती. सोमवारी सायंकाळी संदीप निकिताला भेटण्यासाठी मित्राची दुचाकी घेऊन तिच्या कार्यालयाजवळ पोहोचला. दोघांची भेट झाली. निकिताला घरी सोडण्यासाठी दोघे दुचाकीवरून कांजूरमार्गच्या दिशेने निघाले; मात्र त्यांची दुचाकी हिंदमाता पुलाच्या उतरणीवर घसरली. दोघे रस्त्यावर पडले. इतक्यात मागाहून येणारे वाहन निकिताला चिरडून पुढे गेले. या वाहनाचा चालक निकिता, संदीप यांना कोणतीही वैद्यकीय मदत न पुरविता पसार झाला. अपघातात संदीप जखमी झाला होता. त्याही अवस्थेत त्याने निकिताकडे धाव घेतली; मात्र वाहनाचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली होती. तिला तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

..
रस्त्यावर तेल सांडल्याने दुचाकी घसरली
दादर येथील अपघाताप्रकरणी भौलिवाडा पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सीसीटीव्ही चित्रण तपासून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे, असे भोईवाडा पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. रस्त्यावर तेल सांडल्याने दुचाकी घसरल्याची माहिती संदीपने पोलिसांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com