

रेल्वेतील महिला सुरक्षा अधिक बळकट!
महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांना मिळणार मिरची स्प्रे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेत भारतीय रेल्वेने रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना ‘मिरची स्प्रे कॅन’ देण्याचा निर्णय घेतला आहे. छेडछाड, विनयभंग, महिला डब्यात घुसखोरी यांसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कारवाई करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
दररोज लाखो महिला रेल्वेने प्रवास करतात, मात्र अनेकदा त्यांना असुरक्षिततेची भावना जाणवते. काही ठिकाणी प्रवाशांची गर्दी, अंधाऱ्या प्लॅटफॉर्मवर असणारी निर्जनता, तसेच विनयभंगाच्या घटना यामुळे महिलांची चिंता वाढते. अशा वेळी महिलांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता मिरची स्प्रेचा अतिरिक्त पाठिंबा मिळणार आहे.
रेल्वे सुरक्षा दलातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढवले जात असून, सध्या आरपीएफमध्ये नऊ टक्के महिला कार्यरत आहेत. यातील अनेक जणी ‘मेरी सहेली’ पथकाचा भाग आहेत. देशभरात २५० हून अधिक ‘मेरी सहेली’ पथके कार्यरत असून, दररोज सुमारे १२ हजार ९०० महिला प्रवाशांशी संवाद साधत त्यांना सुरक्षा आणि आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ऑपरेशन मातृशक्ती - मदतीचा हात
महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांनी केवळ सुरक्षेच्या बाबतीतच नव्हे, तर महिलांच्या आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘ऑपरेशन मातृशक्ती’अंतर्गत रेल्वे प्रवासादरम्यान प्रसूती वेदना झालेल्या १७४ महिलांना मदत करून त्यांचे बाळंतपण सुरक्षित पार पडले आहे.
महिला सुरक्षेसाठी पाऊल उचललेच पाहिजे-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘महिला सशक्तीकरण’ आणि ‘सुरक्षित सार्वजनिक वाहतूक’ या दृष्टिकोनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. हा महिलांच्या सुरक्षिततेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावू शकतील, अशी प्रतिक्रिया आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.