

खोदकामात गॅस पाइपलाइन फुटून चार वाहने जळाली
अंधेरीतील घटना; तीन वाहनचालक जखमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः अंधेरी (पूर्व) शेर-ए-पंजाब सोसायटी येथे शनिवारी (ता. ९) रात्री उशिरा रस्त्याचे खोदकाम सुरू असताना रस्त्याखालून गेलेली महानगर गॅस कंपनीची गॅसपाइप फुटली. त्यानंतर झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत चार वाहने जळाली. तसेच तीन वाहनचालक भाजले. तिन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अंधेरी (पूर्व), शेर-ए-पंजाब सोसायटी, तक्षिला, गुरुद्वाराजवळ रस्त्याच्या खालून गेलेली महानगर गॅस निगमची गॅस पाइपलाइन शनिवारी रात्री रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने फुटली. त्यामुळे गॅस पाइपलाइनमधून गॅस गळती सुरू झाली. या गॅसचा आगीशी संपर्क आला आणि त्यामुळे आग लागली. या आगीत दोन दुचाकी, एक तीनचाकी आणि एक चारचाकी अशा चार वाहनांना आगीची झळ बसली. अरविंद कुमार कैथल (२१), अमन हरिशंकर सरोज (२२), सुरेश कैथल या तिघांना तातडीने नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अरविंद आणि अमन यांना उपचार करून सोडण्यात आले, तर सुरेश कैथल यांच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालय उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आगीची माहिती मिळताच महानगर गॅस कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. मध्यरात्री १.३४ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
स्थानिक आमदार मुरजी पटेल, आमदार बाळा नर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. जखमींना मोफत उपचार आणि आर्थिक नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पटेल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.