दोन वर्षांत खासगी शाळांची संख्या दुप्पट
दोन वर्षांत खासगी शाळांची संख्या दुप्पट
राज्यात आयसीएसई, आयबीच्या शाळांना मात्र घरघर
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : राज्यात मागील दोन वर्षांत पटसंख्येच्या निकषामुळे सरकारी तसेच अनुदानित एक हजार ३४९ शाळांना टाळे लागले असताना, या कालावधीत खासगी स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्रीय मंडळाच्या शाळांच्या संख्येत मात्र दुप्पट वाढ झाली आहे. २०२२-२३मध्ये या शाळांची संख्या सहा हजार ६७४ इतकी होती, ती २०२३-२४मध्ये तब्बल १४ हजार ८५१ पर्यंत वाढली. वाढलेल्या शाळांमध्ये राज्य मंडळ आणि सीबीएसई मंडळाच्या शाळांचा समावेश आहे. दुसरीकडे याच कालावधीत मात्र आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी मंडळाच्या २२ बंद पडल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आहे.
राज्यात अगदी ग्रामीण भागामध्ये खासगी शाळांचे पेव फुटल्याने दोन वर्षांत तब्बल आठ लाख २० हजार विद्यार्थी सरकारी तसेच अनुदानित शाळेतून कमी झाले आहेत. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे असला तरी दोन वर्षांत सीबीएसईच्या शाळांची संख्या केवळ ६२ने वाढ झाली आहे. दुसरीकडे मात्र राज्य मंडळाची मान्यता घेतलेल्या खासगी शाळांची संख्या पाच हजार १४४वरून तब्बल १३ हजार २८२वर पोहोचली आहे. त्याची आकडेवारीच आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे. त्यातही खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात २०२२-२३मध्ये इंग्रजी माध्यमाच्या पाच हजार ७६२ शाळा होत्या. त्या २०२३-२४मध्ये १२ हजार ६७० झाल्या. खासगी व्यवस्थापनाच्या मराठी माध्यमाच्या शाळाही ८०२वरून एक हजार ९५४वर जाऊन पोहोचल्याचे अहवालातून नमूद करण्यात आले आहे. यासोबतच उर्दू, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड माध्यमाच्या शाळांची संख्याही ११७ने वाढली असून, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
...
स्वयंअर्थसहाय्यित नव्या शाळा
वर्षे--- राज्य मंडळ--- सीबीएसई--- राज्य मंडळ व सीबीएसई--- आयसीएसई/आयजीसीएसई/आयबी--- एकूण
२०२१-२२--- ५,०९२--- १,०७१--- २१--- ३९३--- ६,५७७
२०२२-२३---५,१४४--- १,११६--- १७--- ३९७--- ६,६७४
२०२३-२४---१३,२८२--- १,१७८--- १६--- ३७५--- १४,८५१
...
माध्यमनिहाय नव्या शाळा
वर्षे--- मराठी--- इंग्रजी--- हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, कन्नड
२०२१-२२--- ८२३--- ५,६३९--- ११५
२०२२-२३ --- ८०२--- ५,७६२--- ११०
२०२३-२४--- १,९५४--- १२,६७०--- २२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

