मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत तासभर बत्ती गुल

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत तासभर बत्ती गुल

Published on

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत तासभर बत्ती गुल
गुजरातमध्ये विजेच्या वेस्टर्न ग्रीडमध्ये बिघाड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याला वीजपुरवठा करणाऱ्या वेस्टर्न ग्रीडला गुजरातमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज दुपारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याच्या काही भागात सुमारे तासभर तीन हजार मेगावॉटचे भारनियमन करावे लागले. त्यामुळे वीज ग्राहकांची काहीशी गैरसोय झाली. दरम्यान, ग्रीड पूर्ववत झाल्याने सर्व विभागांतील वीजपुरवठा तासाभराने पूर्ववत करण्यात आला.
देशाच्या कानाकोपऱ्यात तयार होणारी वीज सेंट्रल ग्रीडच्या माध्यमातून वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यासाठी वेस्टर्न ग्रीड कार्यरत आहे. या ग्रीडला वीजपुरवठा करणाऱ्या गुजरातमधील गॅसवरील वीज केंद्रात दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी बिघाड झाल्याने विजेची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण ग्रीड फेल होऊन वीजपुरवठा खंडित होण्याऐवजी महाराष्ट्र भार प्रेषण केंद्राने (एसएलडीसी) सर्व वीज वितरण कंपन्यांना काही भागांत भारनियमन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महावितरणने ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याच्या काही भागांत टप्प्याटप्प्याने सुमारे तीन हजार मेगावॉटचे तासभर भारनियमन केले. तसेच अदाणी इलेक्ट्रिसिटीने बोरीवली, मालाड, मिरा भाईंदर परिसरात ८७ मेगावॉटचे भारनियमन केल्याने अनेक घरगुती ग्राहकांना त्याचा फटका बसला. दरम्यान, ग्रीडचा समतोल राखण्यासाठी टाटा पॉवरने आज अतिरिक्त ५५० मेगावॉट वीजनिर्मिती केल्याचा दावा केला.
----
सव्वा लाख ग्राहकांना फटका
‘एसएलडीसी’च्या निर्देशानुसार, महावितरणने ठाणे परिसरात घोडबंदर रोड, वागळे इस्टेटसह मुलुंड, नवी मुंबईत कोपरखैरणे, सानपाडा, नेरूळ, खारघरच्या काही भागांत सुमारे एक तास १४६ मेगावॉटचे भारनियमन केले. त्याचा सुमारे सव्वा लाख वीज ग्राहकांना फटका बसल्याची माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com