

हवामान बदलांविषयी तरुणांना कौशल्याचे धडे
‘ब्रिटिश कौन्सिल’च्या ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’ मुंबई विद्यापीठाची निवड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये हवामान बदलाविषयी जनजागृती करून याबाबत त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलकडून ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’ सुरू केला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली असून, ब्रिटिश कौन्सिल आणि एचएसबीसी यांच्या अर्थसहाय्याने विद्यापीठात हा उपक्रम राबविला जाणार आहे.
ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि भारतात हा उपक्रम राबवला जात आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणे आणि निरंतर विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलने देशभरातील उच्चशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. देशभरातून तीन उच्चशिक्षण संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाची निवड झाली आहे. विद्यापीठामधे स्थापन झालेल्या ‘कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पस’ उपक्रमाअंतर्गत जैवविविधता प्रकल्प, पाणथळ भूमी संवर्धन, हरित कॅम्पस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, असे विविध पर्यावरणपूरक प्रकल्प राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पावर काम करण्यास मुंबई विद्यापीठाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठातील डॉ. अपर्णा फडके, प्रा. इंदू जॉर्ज आणि डॉ. सुहास जेजूरीकर हे प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत.
------
कसा राबवणार उपक्रम?
- ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’ उपक्रमाअंतर्गत उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार हवामान बदलांबाबत जागरूकता, हवामान बदलांचे परिणाम आणि त्याची दाहकता कशी कमी करता येईल, यावर भर दिला जाणार आहे.
- ब्रिटिश कौन्सिलने या प्रकल्पाअंतर्गत १३० प्रशिक्षक आणि ८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु मुंबई विद्यापीठाने या उपक्रमाची व्याप्ती वाढवून विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सात जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यायचे ठरवले आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय आणि सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठामार्फत किमान १३० ठिकाणी हवामान बदलाच्या संदर्भातील स्थानिक समस्या आणि त्यांचे निराकारण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
- या कार्यक्रमाअंतर्गत २५ प्रशिक्षकांची निवड झाली असून, या सर्वांचे प्रशिक्षण २२ ते २६ मार्च २०२५ यादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांना ब्रिटिश कौन्सिलच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षित केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.