कौशल्याधारीत शिक्षण देण्यावर भर द्यावा ः सोनवणे

कौशल्याधारीत शिक्षण देण्यावर भर द्यावा ः सोनवणे

Published on

कौशल्याधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा ः सोनवणे
दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचा ५५ वर्धापनदिन समारंभ उत्साहात
मुंबई, ता. २५ : जग आपल्याकडे संधीच्या रूपात पाहत असल्याने अनेक क्षेत्रांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक कौशल्याधारित आणि रोजगारक्षम अभ्यासक्रम राबविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. त्‍यांनी सोमवारी (ता. २४) मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या ५५व्या वर्धापनदिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांशी संवाद साधला.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर आदी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून पुढे येत असलेल्या वाढवण बंदराला लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी विद्यापीठांकडे मोठी संधी आहे. या संधीमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवता येणार आहे. तांत्रिक कौशल्यासह अतांत्रिक कौशल्य विकसित करून विद्यापीठांना पुढाकार घ्यावा लागेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढाकारातून संशोधनाचे पुष्प पुस्तक रूपाने तयार करण्यात आले असून, संशोधनाचे विषय ते अहवाल लिहिण्यापर्यंत १०० पानांचे पुष्प तयार करण्यात आले आहे. यासाठी दोन्ही विद्यापीठांनी पुढे येऊन नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी डेटा ॲनालिसिस, क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिटिकल थिंकिंग अशा अतांत्रिक कौशल्यांवर काम करण्याची दोन्ही विद्यापीठांनी संयुक्तपणे काम करण्याची संधी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकत काळाची पावले ओळखत सीडीओईने मार्गक्रमन करण्याच्या सूचना दिल्या. भारतासह जगभरात संधींचे अमर्यादित दालन खुले होत असून, त्याअनुषंगाने विस्तारित होत असलेल्या ऑनलाइन, ब्लेंडेड, हायब्रिड आणि मायक्रो लर्निंगनुसार अधिकाधिक अभ्यासक्रम तयार करावे, पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच रोजगारक्षम कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यावर सीडीओईने भर द्यावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी सीडीओईंनी पुढाकार घेतला असून, याची व्याप्ती वाढविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सीडीओईने कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देतानाच नॅनो टेक्नोलॉजी आणि सेमी कंडक्टरच्या क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ सीडीओईने तयारी करावे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com