डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात स्टार्टअपचा श्रीगणेशा

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात स्टार्टअपचा श्रीगणेशा
Published on

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात स्टार्टअप

आदिवासी विद्यार्थिनीने बनविले रानमेव्याचे खाद्यपदार्थ


संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. २८ : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात पहिल्यांदाच स्टार्टअप उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठातील एमएस्सीच्या द्वितीय वर्षात वनस्पतीशास्त्र विषयाचे शिक्षण घेणाऱ्या सुलक्षणा धाडगा या मुलीने रानमेव्यांपासून लोणचे, चटणी अशी विविध प्रकारची उत्पादने बनवली आहेत. या उत्पादनांना मोठी पसंती मिळत असून, यातून भविष्यात आदिवासींसाठी रोजगाराचा नवा मार्ग खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यातील गिरगाव या आदिवासी गावातील सुलक्षणा धाडगा ही रहिवासी आहे. आई-वडिलांनी तिला जंगलातील, शेतीतील कामे करून एमएस्सीपर्यंत शिक्षणासाठी बळ दिले आहे. आपल्यातील या कौशल्य गुण आणि आई-वडिलांचा नैसर्गिक वारसा याच्या आधारावर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात स्टार्टअप सुरू केले आहे. यासाठी तिने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील रानमेव्यांपासून बनविलेल्या विविध प्रकारच्या चटणी, लोणचे या पदार्थांचे प्रदर्शन भरविले होते. त्यातून तिला मोठे बळ मिळाले. यातूनच तिला स्टार्टअपची कल्पना सुचली. तिच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे पाठबळ मिळाले आहे. दुसरीकडे वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. अर्पणा सराफ यांनीही उत्साह वाढवला असल्याचे तिने सांगितले.
--
अशी केली उत्पादनांची सुरुवात
तलासरी जिल्ह्यातील जंगलात करवंदे मुबलक प्रमाणात मिळतात. सुलक्षणा धाडगा हिने या करवंदांवर प्रक्रिया करून त्यापासून लोणचे आणि चटणीचे विविध प्रकार तयार केले आहेत. त्यासोबत डोंगरजिराचा (धान्य) वापर करून तिने चटणी तयार केली आहे. यासोबतच अजोला, माटाची भाजी तसेच आंब्यांची चटणीही आहे. लोणच्याचे तिने सॉल्ट वॉटरचा वापर करून चारहून अधिक प्रकार तयार केले आहेत. यात टेटूच्या शेंगा, बांबू सूट, करवंद आणि आंब्याचा वापर करून हे लोणचे तयार केले आहे. या पदार्थांच्या चवीमुळे येत्या काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाने व्‍यक्त केली.
--
कोट
सुलक्षणा धाडगा हिच्यातील कौशल्य गुण आणि वेगळेपणा तिने तयार केलेल्या स्टार्टअपमधून दिसून आला आहे. महिलादिनानिमित्त भरविण्यात आलेल्या प्रदर्शनातून तिची ही वेगळी ओळख समोर आली. आता विद्यापीठाने तिला पाठबळ दिल्याने ती या क्षेत्रात चांगली भूमिका बजावू शकेल, असा विश्‍वास आहे. यासाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
- डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
--
निसर्गाने आपल्याला मुबलकपणे रानमेवा, फळे, फुले दिली आहेत. त्यांचा वापर करून कसे जगायचे, हे आमच्या लोकांना चांगले माहीत आहे. आम्ही त्याचा व्यवसाय करू लागलो, तर प्रतिसाद मिळत नाही; परंतु नव्या पद्धतीने आणि विद्यापीठाचे पाठबळ मिळाल्याने आमची अन्नसंस्कृती आणि तिला समोर आणण्याची संधी मिळाली आहे. ती मला स्टार्टअपमधून पुढे घेऊन जायची आहे.
- सुलक्षणा धाडगा, विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com