

मोतीबिंदू शस्त्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या तीन वर्षांत २५,६९,७५३ शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : प्रधानमंत्री मोतीबिंदूमुक्त भारत योजनेंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात तीन वर्षांत २५,६९,७५३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच स्वयंसेवी संस्था आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशने तीन वर्षांत ५० लाखांहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत.
प्रधानमंत्री मोतीबिंदूमुक्त भारत योजनेंतर्गत देशव्यापी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत, २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये देशभरात सुमारे २.७ कोटी मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे लक्ष्य आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात ५५ लाख ४८ हजार ५००, महाराष्ट्रात २७ लाख ९५ हजार २००, पश्चिम बंगालमध्ये २३ लाख १९ हजार, मध्य प्रदेशात १७ लाख तीन हजार ७००, बिहारमध्ये १४ लाख ६० हजार ९००, मध्यप्रदेश एक लाख एक हजार, अरुणाचल प्रदेशात एक लाख ८७ हजार, तमिळनाडू १८ लाख सात हजार आणि तेलंगणामध्ये १४ लाख ७५ हजार ६०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महाराष्ट्राने डिसेंबर २०२४ पर्यंत २५ लाख ६९ हजार ७५३ शस्त्रक्रिया करून उद्दिष्टाच्या ९१ टक्के लक्ष्य गाठले आहे.
मोतीबिंदू काय आहे?
मोतीबिंदू हा डोळ्यांचा प्रमुख विकार असल्याचे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. शशी कपूर यांनी सांगितले. डोळ्यांच्या आतील लेन्स काचेसारख्या स्वच्छ असतात; परंतु वाढत्या वयाबरोबर डोळ्यांच्या आतील लेन्स पांढऱ्या होतात. त्यामुळे दृष्टी अंधुक होते. एका किंवा दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू होऊ शकतो.
५० वर्षांवरील लोकांमध्ये अधिक समस्या
डॉ. कपूर यांच्या म्हणण्यानुसार, मोतीबिंदू ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जास्त होतो. मधुमेहामुळे लहान वयातही मोतीबिंदू होऊ शकतो. काही बाळांनाही मोतीबिंदूचा त्रास होतो. मोतीबिंदू का होऊ शकतो याची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. वेळेवर निदान आणि शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया हाच या आजारावर उपाय आहे.
ही आहेत कारणे...
- तेजस्वी प्रकाशाचा सतत संपर्क
- सूर्यप्रकाशात सतत काम करणे
- मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे विकार
- स्टिरॉइड्स, अँटीबायोटिक्स यांसारख्या औषधांचे दुष्परिणाम
- धूम्रपान, जास्त मद्यपान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.