पहिली ते नववीच्या परीक्षेचे वेळापत्रक शाळा स्तरावरच

पहिली ते नववीच्या परीक्षेचे वेळापत्रक शाळा स्तरावरच
Published on

पहिली ते नववीच्या परीक्षेचे वेळापत्रक शाळा स्तरावरच
शाळा, मुख्याध्यापक स्तरावरून अंमलबजावणीसाठी आग्रही
मुंबई, ता. ३० : पहिली ते नववीच्या परीक्षा आतापर्यंत शाळा व्यवस्थापन आण‍ि मुख्याध्यापक स्तरावरून केल्या जातात. त्यासाठीचे नियोजन आणि अंमलबजावणीही केली जाते, यासाठी शाळा संहिता आणि खासगी शाळा नियमावलीने शाळांना अधिकारही दिलेले आहेत. त्याच अधिकारानुसार राज्यात पहिली ते नववीच्या परीक्षा आणि त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची भूमिका शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक संघटनांनी घेतली आहे.
पॅट परीक्षेसोबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने (एससीईआरटी) पहिली आणि नववीच्या वार्षिक परीक्षा या ८ ते २५ एप्रिलदरम्यान आयोजित करण्याचे आदेश जारी केल्याने त्यावर शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक संघटनांनी नियमावली दाखवत यासाठीची माहितीची शिक्षण विभागापुढे सादर केली आहे. तसेच राज्यात सध्या सुरू असलेले तापमान, विदर्भातील २५ एप्रिलदरम्यानचे संभावित तापमान यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी याची माहितीही दिली.
शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी एससीईआरटीच्या संचालकांना पत्र लिहून या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. तसेच आरटीई कायद्यासोबत एसएस कोडमधील नियम, महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवा शर्ती) नियमावली १९८१ अंतर्गत नियम आदींचा दाखला देत मुख्याध्यापकांना असलेले अधिकार, त्यासाठीच्या नियमांची माहिती दिली आहे. मुख्याध्यापकांना परीक्षा घेण्यासंदर्भात देण्यात आलेली जबाबदारी कशी निश्चित करण्यात आली, याची माहितीही शिक्षक आमदार अभ्यंकर यांनी त्या पत्रात नमूद केली आहे. तसेच परीक्षा आणि त्याच्या आयोजनासंदर्भात कायदेशीर तरतुदी आणि स्थानिक हवामान परिस्थिती लक्षात घेऊन २५ एप्रिलपर्यंत परीक्षांसाठी देण्यात आलेल्या अंतिम मुदतीचा पुनर्विचार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
--
कोट
पहिली ते नववीपर्यंतच्या शाळांच्या परीक्षा कशा आयोजित कराव्यात, यासाठीचे नियोजन हे पूर्णपणे शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्या नियंत्रणात असते. तसा अधिकार त्यांना शाळा संहिता आणि खासगी शाळा नियमावली आणि त्यातील तरतुदीनुसार मिळालेला आहे. त्यानुसारच राज्यातील शाळांमध्ये आम्ही या परीक्षा आयोजित करीत आहोत. काही शाळांनी यापूर्वीच या परीक्षांचे वेळापत्रक आणि तयारी केली असून, त्यासाठीची अंमलबजावणी सुरू आहे.
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष- राज्य मुख्याध्यापक महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com