

शिवडीच्या टीबी रुग्णालयातील कुत्र्यांची दहशत कायम
रुग्णांसह नातेवाइकांमध्ये भीती; डॉक्टरांचीही गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : शाळा, महाविद्यालय, रुग्णालये अशा ठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेने प्रयत्न करायला हवेत, मात्र याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसत आहे. शिवडीच्या टीबी रुग्णालयातही कुत्र्यांची दहशत कायम असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रुग्ण व त्यांचे नातेवाईक, डॉक्टर करीत आहेत.
महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात डॉक्टर वसाहती, ओपीडी, वॉर्डपर्यंत हे कुत्रे पोहोचले आहेत. डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह रुग्णवाहिका व व्हीलचेअरवरून येणाऱ्या रुग्णांवर हे कुत्रे धावून जातात. डॉक्टर व कर्मचारी सहा महिन्यांपासून या कुत्र्यांची तक्रार करीत आहेत. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.
डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांवर हे कुत्रे धावून जातात. टीबी रुग्णालयात येणारे रुग्ण हे श्वसनाच्या संबंधित आजार असलेले असतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या मागे कुत्रा लागल्यास धाप लागून रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे टीबी रुग्णालयात वाढणारी कुत्र्यांची संख्या ही मोठी समस्या आहे.
सध्या रुग्णालयात १५ ते २० कुत्रे चार ते पाचच्या टोळक्यांनी फिरत आहेत. त्यांनी रुग्णालय परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे, शिवाय रुग्णालयात असलेल्या कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे की नाही, याबाबत डॉक्टरांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.
रुग्णालय परिसर असतानाही बाहेरून येणारे नागरिक व प्राणिप्रेमी कुत्रे बसत असलेल्या ओपीडी व रुग्णालयाजवळच जेवण व खाणे देतात. त्यामुळे या परिसरातून कुत्रे बाहेर जात नाहीत. याचा त्रास डॉक्टर व रुग्णांना होत आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दिवसभर काम केल्यानंतर रात्रीदेखील या कुत्र्यांच्या व्हिवळण्यामुळे झोप लागत नाही. कुत्रे टोळ्या करून फिरत असल्याने लहान मुले व घरातील वृद्धांना परिसरात फिरणे शक्य होत नाही. त्यामुळे टीबी रुग्णालय परिसरात राहणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
व्हीलचेअरवर हल्ला
रात्रीच्या वेळी महिला डॉक्टरच्या मागे कुत्रे लागल्याने मोबाईल जमिनीवर पडून फुटल्याची घटना घडली आहे. तसेच व्हीलचेअर दिसल्यानंतर हे कुत्रे हल्ला करत असल्याने रुग्ण, रुग्णांसोबत असलेले नातेवाईक व व्हीलचेअर नेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे
डिलिव्हरी बॉयचा रुग्णालयात येण्यास नकार
रुग्णालयात आत आणि बाहेर करण्यासाठी एकच मार्ग असल्याने या कुत्र्यांच्या दहशतीमुळे जेवण मागवल्यास झोमॅटो, स्वीगी यांसारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय आत येण्यास नकार देत असल्याचे डॉक्टर सांगतात, तर रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात रुग्णांबाबतची फाइल घेऊन जाण्यास कर्मचारी नकार देतात. याबाबत अनेक डॉक्टर, कर्मचारी तक्रारी करत असूनदेखील रुग्णालय प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.