सरकार म्हणून संवेदनशीलता दाखवा!

सरकार म्हणून संवेदनशीलता दाखवा!
Published on

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

सरकार म्हणून संवेदनशीलता दाखवा!

विद्यार्थी सुरक्षेच्या शिफारशींबाबत न्यायालयाकडून कानउघाडणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचारप्रकरणी नेमलेल्या समितीने शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांसाठी शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी लागू करण्यासाठी झालेल्या विलंबावरून बुधवारी (ता. ९) मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. बदलापूरसाख्या घटना हाताळण्यासाठी तसेच भविष्यात असे प्रसंग टाळण्याबाबत सरकारला असलेल्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून या प्रकरणात सरकारने संवेदनशीलता दाखवून तातडीने शासन आदेश काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारने संवेदनशीलता दाखवावी. सरकारला खरोखर काळजी असेल तर ते दिवसरात्र काम करेल, अशा शब्दांत या खंडपीठाने फटकारले. ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अक्षय शिंदे हा कथित पोलिस चकमकीत ठार झाला होता. उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल करून उच्च न्यायालयाचे दोन निवृत्त न्यायाधीश आणि काही तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीला शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत एक अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले होते. या समितीने फेब्रुवारी २०२५मध्ये अहवाल सादर केला. उच्च न्यायालयाने सरकारला या शिफारशींचा विचार करण्याचे तसेच राज्यातील शाळांसाठी आवश्यक तो जीआर काढण्याचे निर्देश दिले होते. अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी या शिफारशी अंमलबजावणीसाठी खंडपीठाकडे आणखी अवधी मागितला. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या शिफारशींचा विविध शासकीय विभागाने आढावा घेणे गरजेचे असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. त्यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्‍यक्त करून तातडीने शासन आदेश काढण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे.
-----
अजून किती वेळ घेणार?
अजून किती वेळ घेणार आहात, सरकार म्हणून तुमची संवेदनशीलता कशा प्रकारे दाखवणार आहात, असे खडसावत या शिफारशी शाळांवर व्यापक परिणाम करणाऱ्या आहेत. अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांवर सरकार आत्मसंतुष्ट राहू शकत नाही, असेही न्यायालयाने सुनावले.

..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com