एकत्रित पुनर्विकासाचे आव्हान!

एकत्रित पुनर्विकासाचे आव्हान!
Published on

एकत्रित पुनर्विकासाचे आव्हान!
निर्णय चांगला पण टाइमलाइन हवी; आदर्शनगर, वांद्रे रिक्लेमेशनच्या म्हाडा इमारतींबाबत रहिवाशांची भावना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मोतीलालनगर, अभ्युदयनगरच्या धर्तीवर वरळीच्या आदर्शनगर आणि वांद्रे रिक्लेमेशन येथील म्हाडाअंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे आदर्शनगर आणि वांद्रे रिक्लेमेशन येथील रहिवाशांकडून स्वागत होत असले तरी काहीशी सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे. एकत्रित पुनर्विकासाचा निर्णय चांगला आहे, पण टाइमलाइन हवी. पुनर्विकासाचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने म्हाडाअंतर्गत असलेल्या गोरेगावचे मोतीलालनगर, चिंचपोकळी येथील अभ्युदयनगर, वरळीचे आदर्शनगर आणि वांद्रे रिक्लेमेशन येथील इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याची संकल्पना होती, मात्र गेल्या १२ वर्षांपासून मोतीलालनगरचा पुनर्विकास पूर्ण होऊ शकलेला नाही. तसेच अभ्युदयनगरसाठीही अद्याप विकसक पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे आदर्शनगर आणि वांद्रे रिक्लेमेशन येथील इमारतींचा पुनर्विकास करताना याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच रहिवाशांना मोठ्या घराबरोबरच काॅर्पस फंड, तात्पुरत्या निवासासाठी सुमारे ४० हजार रुपये भाडे दिले जावे. एकत्रित पुनर्विकासासाठी आम्ही सकारात्मक आहोत मात्र पुनर्विकास वेळेत मार्गी लागावा, अशी भावना सहा-सात दशकांपासून वरळीच्या आदर्शनगरात राहणारे रहिवासी जयंत राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान, सुमारे अडीच हजार रहिवासी असलेल्या या दोन्ही ठिकाणच्या इमारतींचा म्हाडामार्फत बांधकाम आणि विकसन संस्था (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) नियुक्ती करून पुनर्विकास केला जाणार आहे.

सद्य:स्थिती
* आदर्शनगर वरळी
भूखंड - ६८ हजार चौरस मीटर
एकूण इमारती - ५८
सदनिका - ८६३
सदनिकेचे चटई क्षेत्रफळ - २७० ते ८६० चौरस फुट

* वांद्रे रिक्लेमेशन
भूखंड - १ लाख ९७ हजार चौरस मीटर
एकूण इमारती - ५२
सदनिका - १६८८
सदनिकेचे चटई क्षेत्रफळ - ३३२ ते ८२५ चौरस फुट

आदर्शनगर, वांद्रे रिक्लेमेशन येथील इमारती पुनर्विकासाला आल्या आहेत. त्याच धर्तीवर सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पण एकत्रित पुनर्विकास कधी होणार, कशा पद्धतीने होणार याची टाइमलाइन ठरवायला हवी अन्यथा मोतीलालनगर किंवा अभ्युदयनगरप्रमाणे विलंब झाल्यास नको तो पुनर्विकास, अशी भावना निर्माण होऊ शकते.
- संतोष सावंत, रहिवासी

आदर्शनगरचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय चांगला आहे, पण पुनर्विकासाला कधी सुरुवात होणार, कधी पूर्ण होणार याबाबत सरकारने किंवा म्हाडाने निश्चित वेळापत्रक द्यायला हवे. आम्ही गेल्या ७० वर्षांपासून येथे राहतोय. त्यामुळे आतातरी मोठ्या घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच अपेक्षा आहे.
- जयंत राऊत, रहिवासी

प्रत्येक इमारतीचा स्वतंत्र पुनर्विकास करण्याऐवजी एकत्रित पुनर्विकास करणे हे रहिवाशांच्या हिताचे आहे. त्यामुळे ड्रेनेज लाइन, जलवाहिन्या, रस्ते अशा सुविधांची रचना मोठी करणे शक्य होते. इमारतींचा लेआऊट चांगला करता येतो, पण सर्वकाही वेळेत होणे गरजेचे आहे. तसेच सध्या आमच्या घराच्या चटई क्षेत्रफळाच्या तुलनेत खासगी विकसक दुप्पट क्षेत्रफळ देण्याची तयारी दर्शवत आहेत. त्यामुळे एकत्रित पुनर्विकासातून त्याहून अधिक मोठ्या सदनिका मिळायला हव्यात.
- ॲड. इंद्रजित सूर्यवंशी, रहिवासी

एकत्रित पुनर्विकास करणे ही चांगली संकल्पना आहे; मात्र प्रकल्प विकसकाला न देता त्याच्यावर सरकारने किंवा म्हाडाने स्वत: कंत्राटदार नेमून काम पूर्ण करावे. त्यामुळे सरकारला किंवा म्हाडाला विक्रीयोग्य सदनिका, भूखंडाच्या विक्रीतून मोठा निधी मिळू शकतो.
- चंद्रशेखर प्रभू, ज्येष्ठ वास्तुविशारद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com