तलवारीने केक कापणाऱ्यांसह सात अटकेत

तलवारीने केक कापणाऱ्यांसह सात अटकेत
Published on

तलवारीने केक कापणाऱ्यांसह सात अटकेत
इतरांचा शोध सुरू; पोलिसांनी घडविली गुन्हेगारांना अद्दल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः वाढदिवसाचा केक तलवारीने कापून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या झियाउद्दिन अन्सारी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणास भांडुप पोलिसांनी बेड्या ठोकल्या, पण त्याच्या पार्टीत सहभागी असलेल्यांचीही धरपकड सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या आरोपींना हद्दपार, स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.
भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारीसह फिरोज मुनीर अन्सारी, कमलेश जैन, शहानवाज सरवया, शैलेश गुप्ता, शहाबाज अन्सारी, जब्बार उर्फ सानू शेख या सात जणांना अटक केली. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, या पार्टीला उपस्थित असलेल्या आणखी १५ ते २० तरुणांचा शोध सुरू आहे. पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना पोलिसांच्या लक्षात आली; मात्र असे प्रकार घडण्याआधीच थांबवता यावेत यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्या, टोळीयुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी उपनगरातील गोपनीय माहिती काढण्यावर अधिक भर देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
----
अशी घडली घटना
प्रमुख आरोपी अन्सारीविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीसह आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ११ एप्रिलला भांडुपच्या गौतमनगर परिसरात अन्सारीचा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त २८ केक आणण्यात आले होते. प्रत्येक केकवर अक्षर आणि आकड्यांनी अन्सारीचे नाव, भांडुप किंग आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांची कलमे कोरण्यात आली होती. त्यापुढे प्रश्नचिन्ह असलेला एक केक ठेवण्यात आला होता. त्यावरून अन्सारी हा भांडुपच्या गुन्हेगारी जगतातील मोठा गुंड असून त्याने केलेल्या गुन्ह्यांचा संदेश त्याद्वारे देण्यात आला होता. त्याने हे केक तलवारीने कापले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
----
पोलिस कारवाई
व्हिडिओ निदर्शनात येताच पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी तातडीने सहायक आयुक्त जितेंद्र आगरकर, वरिष्ठ निरीक्षक खंडागळे यांनी अन्सारीसह पार्टीत सहभागींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भांडुप पोलिस ठाण्यात १४ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच विविध पथके तयार करून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली.
-----
केक पुरविणाऱ्याचा शोध
अन्सारीच्या वाढदिवसाला २८ केकची ऑर्डर कोणी दिली, कोणी ती पुरवली याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
---
कोट
असे प्रकार खपवून घेणार नाही. अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांवर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत. परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी कुठलीही कृती घडल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- विजयकांत सागर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com