शून्य टक्के व्याजावर कर्जाच्या निमित्ताने १.१४ कोटींची फसवणूक

शून्य टक्के व्याजावर कर्जाच्या निमित्ताने १.१४ कोटींची फसवणूक
Published on

शून्य टक्के व्याजावर कर्जाच्या निमित्ताने १.१४ कोटींची फसवणूक
दोन वर्षांनी दिल्लीतून सायबर भामट्यांना बेड्या; कॉल सेंटरआडून देशभर गुन्हे
मुंबई, ता. २६ ः शून्य टक्के व्याजाने मोठमोठ्या रकमांचे कर्ज सहज मिळवून देऊ, असे प्रलोभन दाखवत शहरातील एका ज्येष्ठ नागरिकास दोन वर्षांपूर्वी १.१४ कोटींचा गंडा घालणाऱ्या टोळीस सायबर पोलिसांनी नवी दिल्लीतून अटक केली. या टोळीने मुंबईप्रमाणे अन्य राज्यांतही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहजाद रेहमान (३०), अनुज रावत (३०), अमर हुसेन (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या तिघांनी नवी दिल्ली, आनंद विहार येथे कॉल सेंटर सुरू केले होते. तेथून विविध निमित्ताने नागरिकांना फोन करून फसवणूक केली जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वृद्धास संपर्क साधून दिल्ली येथील बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. शून्य टक्के व्याजावर मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून देऊ, असे प्रलोभन या भामट्यांनी दाखवले. पुढे तक्रारदारास बजाज फायनान्स, येस बँकेची बनावट कागदपत्रे पाठवून कर्ज मंजूर झाल्याची थाप मारली. मात्र त्यासाठी आलेला खर्च, सेवा शुल्क आणि अन्य निमित्ताने तक्रारदाराकडून १.१४ कोटी रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.
या प्रकरणाचा सायबर पोलिस ठाण्याकडून (पश्चिम विभाग) सुरू होता. पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश मजगर, सहाय्यक निरीक्षक पूनम जाधव, संदीप पाचांगणे, उपनिरीक्षक दीपक तायडे, अंमलदार सचिन सावंत, केशव तकीक, अमोल फाफळे, दीपक पडळकर, राहुल भडांगे आणि प्रीतम व्यवहारे या पथकाने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील कॉल सेंटरबाबत माहिती मिळवली. दोन दिवस पाळत ठेवून दिल्ली पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकला. या कारवाईत तीन आरोपी हाती लागले. तसेच १०५ मोबाईल फोन, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला.

देशभरातील १३२ गुन्ह्यांमध्ये सहभाग
कारवाईत पोलिसांच्या हाती लागलेले १०५ मोबाईल विविध राज्यांमध्ये १३२ सायबर गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आले होते. त्यावरून या टोळीने देशभर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे केल्याचे स्पष्ट होते, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com