

राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते, त्यामुळे दुर्गंधी आणि विविध आजार फैलावतात. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून या सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात पाठपुरावा केला होता.
कुत्रे, मांजर, पांढरे उंदीर इतर गोवंशीय पाळीव प्राणी यांची वयोमर्यादा कमी असते. मृत्यूनंतर या प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट न केल्यास, दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागते. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने दिलेल्या आहेत. तसेच यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आखलेल्या असून त्याच्या अंमलबजावणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी, असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी दिलेल्या जागेला संरक्षण भिंत बांधून सुरक्षाव्यवस्था पुरवावी. प्राण्यांची अंत्यविधी करताना योग्य ती दक्षता घ्यावी. त्यातून दुर्गंधी निर्माण होणार नाही, इतर आजार पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ठरावीक शुल्क आकारून पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी नागरिकांना परवानगी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.
---------------------------
पहिला प्रयोग ठाणे, मिरा भाईंदरमध्ये
पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाणे आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात येत आहे. या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या राखीव जागांत गॅस शवदाहिनीच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संयंत्र बसवण्यात आले आहे. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.