

हार्बर मार्गावर धावणार
१४ एसी लोकल फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे व बदलापूर मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने आता हार्बर मार्गावरही एसी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत हार्बर मार्गावर १४ नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हार्बर मार्गावर ३० जानेवारी २०२० रोजी पहिल्यांदा एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती; मात्र गोवंडी आणि मानखुर्द येथे प्रवाशांचा तीव्र विरोध आणि लोकलवर झालेल्या दगडफेकीनंतर ही सेवा बंद करण्यात आली होती. आता तब्बल पाच वर्षांनंतर मध्य रेल्वेने पुन्हा हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्याने मिळालेल्या एसी लोकलमुळे हार्बर मार्गासाठी १४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच यासंबंधीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद दरवाजाच्या लोकल सुरू करण्याचे निर्देश रेल्वेला मिळाले आहेत. त्यामुळे उपनगरी मार्गावरील गाड्यांचे टप्प्याटप्प्याने वातानुकूलीकरण सुरू आहे.
सीएसएमटी ते ठाणे व बदलापूर मार्गावरील १६ पारंपरिक लोकल गाड्यांच्या जागी एसी लोकल गाड्या धावू लागल्या असून, प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मध्य रेल्वेवर दररोज ८० एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात.
----
...तर त्या गाड्या मुख्य मार्गावर!
हार्बर मार्गावर नव्या १४ फेऱ्या सुरू झाल्यावर एकूण एसी फेऱ्यांची संख्या ९४ होणार आहे. जर पुन्हा प्रवाशांकडून विरोध झाला किंवा एसी लोकलवर दगडफेक झाली, तर हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करून त्या सीएसएमटी-कल्याण, बदलापूर आणि टिटवाळा मार्गांवर वळवण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.