एसएमएस, ई मेलद्वारे मिळणार मालमत्ता देयके
एसएमएस, ई-मेलद्वारे मिळणार मालमत्ता देयके
केवायएसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे पालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महानगरातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर संबंधित विविध सेवासुविधांचा ऑनलाइन पद्धतीने लाभ घेता यावा, कर भरणा प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने महापालिकेने मालमत्ता कर संदर्भात ऑनलाइन सेवा उपलब्ध केली आहे. या ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/#/login या संकेतस्थळावर जाऊन ‘आपले ग्राहक ओळखा’ (केवायसी) ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे मालमत्ता देयके मिळणार आहेत, शिवाय ऑनलाइन नोंदणी केल्यास वेळोवेळी सूचनाही प्राप्त होणार आहेत.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत आहे. करनिर्धारण व संकलन खात्याकडून महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे करनिर्धारण करून मालमत्तांना दरवर्षी कर देयके निर्गमित करून कर संकलन केले जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता १० लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना मालमत्ता कर देयके निर्गमित केली जाणार आहेत. अद्यापपर्यंत अंदाजे चार लाख मालमत्ताधारकांकडून मालमत्तांचे ऑनलाइन पद्धतीने ‘केवायसी’ अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कर संदर्भात एसएमएस, ‘ई-मेल’द्वारे वेळोवेळी सूचना प्राप्त होत आहेत.
ग्राहकांना संकेतस्थळावर जाऊन मालमत्ता लेखा क्रमांक, नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, प्रवर्ग (उदा. मालक/सचिव/अध्यक्ष/लेखापाल/इतर) आदी माहिती भरावी लागेल. तसेच समभाग (शेअर) प्रमाणपत्र; गॅसदेयक/वीजदेयक/दूरध्वनीदेयक; गृहनिर्माण संस्थेच्या शीर्षपत्रावरील (लेटरहेड) अधिकृत पत्र ही कागदपत्रे ‘स्कॅन’ करून अपलोड करावी लागतील.
ही कामे करता येणार
‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालमत्ताधारकांना देयकांचा ऑनलाइन भरणा करणे, थकबाकी नसल्यास ना हरकत प्रमाणपत्र, देय रकमेचा भरणा केल्याचे प्रमाणपत्र पाहणे, पक्षकाराच्या किंवा मालमत्ताधारकाच्या नावात बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, अधिदान केलेल्या देयकांचा अहवाल पाहणे, मालमत्तेसंबंधित माहिती पाहणे, मालमत्तेचे परिशिष्ट, मालमत्ता कर देयकनिहाय थकबाकी अहवाल, पोचपावती पाहणे आदी सुविधांचा ऑनलाइन पद्धतीने लाभ घेता येईल. प्रशासनाकडून मालमत्ता कराशी संबंधित जारी केलेल्या सूचनादेखील एसएमएस किंवा ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त करता येतील. मालमत्ता कर देयके तयार होताच त्याची ‘पीडीएफ’ स्वरूपातील सॉफ्ट कॉपी करदात्यांना ‘ई-मेल’द्वारे प्राप्त करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.