मुंबई विद्यापीठात आता रसायनशास्‍त्रामध्ये सह पदवीचे शिक्षण

मुंबई विद्यापीठात आता रसायनशास्‍त्रामध्ये सह पदवीचे शिक्षण

Published on

मुंबई विद्यापीठात आता रसायनशास्‍त्रामध्ये सहपदवीचे शिक्षण
अमेरिकेतल्या सेंट लुईस विद्यापीठासोबत करार
मुंबई, ता. १२ : मुंबई विद्यापीठाच्या एम. एस. इन डेटा एनालिटिक्स आणि एम. एस. इन सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांच्या सहपदवीला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता एम. एस. इन केमिकल सायन्सेसमध्ये सहपदवीसाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सहपदवीचे शिक्षण घेता येणार आहे.
मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या शैक्षणिक सामंजस्य कराराच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, रसायनशास्त्र विभागातील डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. सुरेश पवार, सेंट लुईस विद्यापीठाचे नोंदणी व्यवस्थापन उपाध्यक्ष रॉबर्ट रेड्डी, वरिष्ठ धोरणात्मक सल्लागार सुंदर कुमारसामी, ग्लोबल ग्रॅड इनिशिएटिव्हच्या संचालिका अनुशिका जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दोन्ही विद्यापीठामार्फत एम. एस. इन केमिकल सायन्सेस या सहपदवीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात, तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात रसायनशास्‍त्रामधील विविध विषयांतील अध्ययनाच्या शाखा, संशोधन पद्धती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल. त्याचबरोबर या सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे अध्ययन व संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या करारामुळे उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने वाटचाल करताना रसायनशास्त्र शाखेतील उद्योन्मुख क्षेत्रात भारत आणि अमेरिकेतील संशोधनाच्या प्राधान्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील जागतिक समज विस्तृत करण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी संधीचे नवे दालनही खुले होणार असल्याचे प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

सहपदवीचे फायदे
* विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळवण्याची संधी
* मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठाकडून मिळणाऱ्या सहपदवीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची आंतरराष्ट्रीय ओळख वाढविण्यास मदत
* विद्यार्थ्यांना भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील वैविध्यपूर्ण शैक्षणिक वातावरण, अध्यापन पद्धती आणि संशोधन पद्धतींचा फायदा
* दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणे आणि अभ्यास करण्यामुळे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जागरूकता, अनुकूलता आणि भाषा कौशल्ये विकसित करण्यास मदत
* सांस्कृतिक आणि भाषा कौशल्ये वृद्धीस मदत
* दोन्ही संस्थांमधील अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि प्रयोगशाळांच्या प्रवेशामुळे व्यावहारिक कौशल्ये आणि संशोधन क्षमता वाढीस चालना

विद्यार्थ्यांना सहाय्य
मागील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एम. एस. इन डेटा एनालिटिक्स आणि एम. एस. इन सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांनध्ये प्रविष्ट झालेले मुंबई विद्यापीठाचे १० विद्यार्थी हे सेंट लुईस विद्यापीठात तिसऱ्या सत्राच्या शिक्षणासाठी प्रवेशित होत आहेत. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण शुल्कामध्ये ५० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com