सेन्सेक्स १२०० अंश वाढला
सेन्सेक्स १२०० अंश वाढला
मुंबई, ता. १५ : धातूनिर्मिती, आयटी, वाहननिर्मिती आणि बांधकाम व्यवसाय या क्षेत्रातील शेअरच्या जोरदार खरेदीमुळे आज सेन्सेक्स १,२००.१८, तर निफ्टी ३९५.२० अंशांनी वाढला. आज दीड टक्क्यांहून जास्त वाढ झाल्यामुळे सेन्सेक्सने ८२ हजारांचा, तर निफ्टीने २५ हजारांचा टप्पा पार केला.
आजच्या तेजीमुळे सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीचे मूल्य पावणेपाच लाख कोटी रुपयांनी वाढले. जागतिक संमिश्र वातावरणामुळे आज सकाळी शेअर बाजार संथ होते. सुरुवातीला शेअर बाजार ८१ हजारांच्याही खाली गेला होता, मात्र दुपारनंतर जोरदार खरेदी सुरू झाली आणि दिवसाअखेर सेन्सेक्स ८२,५३०.७४ अंशावर, तर निफ्टी २५,०६२.१० अंशावर स्थिरावला.
आज बांधकाम व्यवसाय, ऑइल अँड गॅस, धातूनिर्मिती, प्रसारमाध्यमे, आयटी, वाहन कंपन्या, बँका यांच्या निर्देशांकात एक ते दोन टक्के वाढ झाली. वाहननिर्मिती क्षेत्र सलग तिसऱ्या दिवशी वाढले, तर देशी आणि परदेशी मागणी वाढेल या अपेक्षेत संरक्षण विषयक क्षेत्राच्या कंपन्यांचे शेअरही वाढले. त्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्रही पाऊण ते अर्धा टक्का वाढले.
निफ्टी यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये २५ हजारांच्या टप्प्यावर होता. तेथून घसरण सुरू झाल्यानंतर १४१ दिवसानंतर तो पुन्हा २५ हजारांच्या टप्प्यावर गेला आहे. अमेरिका-भारत व्यापार करार होण्याचे संकेत, कमी झालेली चलनवाढ आणि आगामी पतधोरणात सवलती मिळतील या अपेक्षेत आज सर्वच क्षेत्रे नफा दाखवीत होती, असे विनोद नायर यांनी सांगितले. बुधवारी (ता. १४) देशी आणि विदेशी वित्तसंस्थांनी अशा दोघांनीही खरेदी केली. त्यांनी १,२०० कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले.
आज टाटा मोटर चार टक्के वाढला. एचसीएल टेक साडेतीन टक्के वाढला. अदाणी पोर्ट अडीच टक्के, एटर्नल सव्वादोन टक्के, तर मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट दोन टक्के वाढले. आयसीआयसीआय बँक, एअरटेल, अल्ट्राटेक, सनफार्मा, टेक महिंद्र, टायटन दीड टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. महिंद्र आणि महिंद्र, टाटा स्टील, इन्फोसिस, लार्सन अँड टूब्रो एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. आज केवळ इंडसइंड बँक किरकोळ घसरला.
अमेरिका-भारत व्यापार करार होण्याबाबत अमेरिकी अध्यक्षांनी अनुकूल संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदारांनी शॉर्ट कव्हरिंग केले. त्यामुळे आज तेजी पुन्हा आली.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.