महारेराकडे ५० हजार नोंदणीकृत एजंट

महारेराकडे ५० हजार नोंदणीकृत एजंट

Published on

महारेराकडे ५० हजार नोंदणीकृत एजंट
- एमएमआरचा समावेश असलेल्या कोकण विभागात सर्वाधिक २१ हजार ५० जणांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडला असतानाच स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नोंदणीकृत एजंट्सची संख्याही ५० हजार ६७३ एवढी झाली आहे. त्यामध्ये एमएमआर क्षेत्राचा समावेश असलेल्या कोकण विभागात सर्वाधिक २१ हजार ५० एवढी एजंटची संख्या आहे.
गृहनिर्माण प्रकल्पांप्रमाणेच स्थावर संपदा क्षेत्रात काम करणाऱ्या एजंट्सला महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सध्या महारेराकडे ५० हजार ६७३ एजंटस नोंदणीकृत आहेत. यापैकी ३१ हजार ९८० एजंटस सक्रिय असून, १८ हजार ६९३ एजंट्सची नोंदणी विविध कारणास्तव महारेराने रद्द केलेली आहे. मुंबई महानगरचा समावेश असलेल्या कोकणात विभागात सर्वाधिक २१ हजार ५० असे सर्वात जास्त एजंट्स आहेत. त्यानंतर पुणे परिसरात ८,२०५, नागपूर परिसरात १,५०४, उत्तर महाराष्ट्रात ४९०, संभाजीनगर परिसरात ३४३ आणि अमरावती परिसरात २३ एजंट नोंदणीकृत आहेत.
स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घरखरेदीदार आणि विकसक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटना रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.

विविध राज्यांतील एजंट
मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्यांच्या प्रमुख शहरातील एजंट्सनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैदराबाद, बंगळूर, कांचीपुरम, नैनिताल, गोवा, अहमदाबाद, पटना, जम्मू, इंदोर अशा सुमारे सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.


कोकण विभागातील नोंदणीकृत एजंट
मुंबई शहर- ३,४४५
मुंबई उपनगर- ८,३६५
ठाणे- ६,७६०
रायगड- १,३४०
पालघर- १,०८६
रत्नागिरी- ३१
सिंधुदुर्ग- ११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com