शुल्लक वादातून घर पेटवून देणाऱ्या चौघांवर गुन्हा

शुल्लक वादातून घर पेटवून देणाऱ्या चौघांवर गुन्हा
Published on

क्षुल्लक वादातून घर पेटवून देणाऱ्या चौघांवर गुन्हा
कुटुंबाच्या हत्येच्या हेतूने आरोपींची कृती; दहिसरमधील घटना

मुंबई, ता. २४ : क्षुल्लक कारणावरून घर पेटवून देत संपूर्ण कुटुंबाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी चार तरुणांविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना १४ मे रोजी रात्री दहिसर येथील गणपत पाटील नगरात घडली. सुरुवातीला अपघाताने आग लागल्याचा अंदाज होता; मात्र सीसीटीव्ही चित्रणात आरोपींनी या घराला हेतुपुरस्सर आग लावल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गणपत पाटील नगरात राहणाऱ्या जुली केवट (वय ४०) आणि त्यांचे कुटुंबीय १४ मेच्या रात्री झोपेत होते, मात्र मध्यरात्री अचानक घरात धूर पसरला आणि सर्वांना जाग आली. आग लागल्याचे समजताच सारे जीवाच्या भीतीने घराबाहेर पडले. या आगीत केवट यांचे घर, संसार आणि दुचाकी वाहन जळून खाक झाले. अग्निशमन दल या आगीची चौकशी करत असतानाच केवट कुटुंबीयांच्या हाती परिसरातील सीसीटीव्ही चित्रण लागले. यामध्ये त्यात परिसरात राहणाऱ्या देवराज पाटील (वय २२) आणि त्याचे तीन साथीदारांनी केवट यांच्या दुचाकीला आणि नंतर घराला आग लावल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हत्येचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा नोंदवून पाटीलला बेड्या ठोकल्या, तर त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.


...
बदला घेण्याच्या हेतूने कृत्य
केवट यांचा मुलगा लकी आणि पाटीलचा मित्र शादाब यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. परिसरातील एका व्यक्तीला परस्पर भेटण्यावरून हा वाद झाला. त्यानंतर शादाबने लकीला धमकावले होते. बदला घेण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याची माहिती अटक आरोपीकडील प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे सांगण्यात आले.

या वृत्तास दुजोरा देताना वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले की, अटक आरोपी पाटील सराईत असून, त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्या फरार तीन साथीदारांनाही लवकरच अटक केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com