मेट्रो-२ए आणि ७ सुरळीत धावणार

मेट्रो-२ए आणि ७ सुरळीत धावणार

Published on

मेट्रो-२ए आणि ७ सुरळीत धावणार
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रोकडून आराखडा तयार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पावसाळ्यात सुरक्षिततेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि मेट्रोसेवेचे दैनंदिन संचलन सुरळीत सुरू राहावे, यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी व्यापक पावसाळी उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार वाऱ्याचा वेग मेजणारी यंत्रणा, गाड्यांच्या फेऱ्यात वाढ, स्थानकात हायडेफिनेशन कॅमेरे अशा विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत.


पावसाळ्यात मेट्रो सेवेचे दैनंदिन संचलन सुरळीत राहण्यासाठी मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवरील १० महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘विंड व्हेलॉसिटी अ‍ॅनिमोमीटर’ बसविण्यात आले असून, हवामानाची सद्यःस्थिती सतत तपासून निर्णयक्षमता अधिक सक्षम करण्यात आली आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकात किमान ६४ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, सुरक्षा आणि देखरेख यासाठी चोवीस तास नियंत्रण ठेवण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देता यावा, म्हणून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी स्वतंत्र इमर्जन्सी कोच सज्ज ठेवण्यात आला आहे. डीजी सेट्स, यूपीएस यंत्रणा, लाइटनिंग अरेस्टर्स, अर्थिंग सिस्टीम्स आणि डीवॉटरिंग पंप यांची काटेकोर तपासणी आणि चाचणी करून ३० स्थानके आणि चारकोप डेपो येथे ही साधन सामग्री सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती ‘एमएमएमओसीएल’ने दिली.

सर्वच्या सर्व ३४ मेट्रो गाड्यांची सखोल वॉटरप्रूफ चाचणी करण्यात आली असून, मुसळधार पावसातही गळती होणार नाही, याची खातरजमा करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण ३५ किमी लांबीच्या व्हायाडक्टची स्वच्छता पूर्ण करण्यात आली असून यामध्ये रूफ गटर्स, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप, सॉसर ड्रेन्स, मेडियन चेंबर्स आणि ३० स्थानकांवरील ड्रेनेज लाइन यांचा समावेश आहे.


नियंत्रण कक्षाची उभारणी
मेट्रोच्या योग्य संचालनासाठी पावसाळी नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून, या कक्षात थेट लाइव्ह मॉनिटरिंगची सुविधा आहे आणि हा कक्ष मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडण्यात आला आहे. आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक (१८००८८९०५०५ / ०८०८ आणि ८४५२९०५४३४) २४ तास उपलब्ध आहेत.

पावसाळ्यात मेट्रो प्रणाली पूर्णतः सक्षम आणि प्रवाशांसाठी सज्ज राहावी, यासाठी आमच्या पथकांनी काटेकोरपणे आणि तातडीने काम केले आहे. तांत्रिक तपासण्या असोत किंवा प्रत्यक्ष कार्यस्थळी राबविण्यात आलेल्या उपाययोजना असोत, प्रत्येक बाबतीत ‘सुरक्षा प्रथम’ हाच दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. प्रत्येक ऋतूमध्ये अखंड, कार्यक्षम आणि सुरक्षित मेट्रो सेवा देण्याची आमची बांधिलकी कायम आहे.
- रुबल अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमएमओसीएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com