५७ वर्षीय व्यक्तीच्या फुफ्फुसात सुपारीचे तुकडे

५७ वर्षीय व्यक्तीच्या फुफ्फुसात सुपारीचे तुकडे

Published on

५७ वर्षीय व्यक्तीच्या फुप्फुसात सुपारीचे तुकडे
‘ब्रॉन्कोस्कोपी’ प्रक्रियेतून रुग्णांची त्रासातून सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : गेल्या चार महिन्यांहून अधिक काळापासून वारंवार फुप्फुसांच्या संसर्गाशी झुंजणाऱ्या ५७ वर्षीय रुग्णाला आराम मिळाला असून, त्याच्या फुप्फुसात अडकलेल्या सुपारीचे तुकडे यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. तन्वी भट्ट यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ‘ब्रॉन्कोस्कोपी’ प्रक्रियेमुळे अडकलेल्या सुपारीच्या तुकड्यांचा शोध घेऊन ते बाहेर काढले.


गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी येथे राहणारा रुग्ण राजीव पटेल (नाव बदलले आहे) यांना झोपून तंबाखू आणि सुपारी खाण्याची सवय होती; चार महिन्यांहून अधिक काळ ते सतत आजारी पडत होते, वारंवार न्यूमोनियाचे निदान होऊन त्यावर उपचार केले जात होते. तरीही फारसा फरक पडत नव्हता. रुग्णाला नैराश्य आणि थकवा येऊ लागला, दम लागणे, खोकला येणे आणि अस्वस्थता या समस्या होत्या. याबाबत डॉ. तन्वी भट्ट यांनी सांगितले की, ‘ या रुग्णाच्या ब्रॉन्कोस्कोपी चाचणीमध्ये फुप्फुसाच्या उजव्या बाजूच्या खालच्या भागात सुपारीचे तुकडे अडकल्याचे आढळून आले. ज्यामुळे सूज, फुप्फुसांचे वारंवार संक्रमण तसेच न्यूमोनियाची लक्षणे दिसून येत होती. इमेजिंगमध्ये संसर्ग दिसून येतो, ज्यामुळे ब्रॉन्कोस्कोपीसारखी पुढील तपासणी न करता चुकीचे निदान केले जाते. या प्रकरणात वारंवार होणारा न्यूमोनिया हा फुप्फुसांमध्ये अडकलेल्या सुपारीच्या तुकड्यांमुळे श्वास घेण्यात येत असलेल्या अडथळ्यामुळे झाला होता.’

ब्रॉन्कोस्कोपी चाचणी कशी केली जाते?
डॉ. तन्वी भट्ट यांनी सांगितले की, ब्रॉन्कोस्कोपी चाचणीत घशात भूल देणारी औषधे दिली जातात. प्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या आतील शिरांमध्ये वेदनाशामक औषध दिली जातात. या चाचणीसाठी केवळ ५ ते १० मिनिटे लागतात. कधीकधी लोकांना झोपून खाण्याची किंवा तोंडात जास्त वेळ अन्न ठेवण्याची (उदा. बडिशेप) सवय असते, ज्यामुळे निरोगी व्यक्तींमध्येही एस्पिरेशनचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा एस्पिरेशनमुळे न्यूमोनिया किंवा फुप्फुसांमध्ये गुंतागुंत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com