अवयव दानासंदर्भात जनजागृतीची गरज

अवयव दानासंदर्भात जनजागृतीची गरज

Published on

अवयवदानासंदर्भात जनजागृतीची गरज
आरोग्‍यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन; अवयव प्रत्यारोपण समितीचे रौप्यमहोत्सवी वर्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : सायन रुग्णालय स्थित झेडटीसीसी म्हणजेच अवयव प्रत्यारोपण समितीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना अवयवदानासंदर्भातील सर्व प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी (ता. २७) अवयव प्रत्यारोपण समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सायन रुग्णालयात ते बोलत होते.
या वेळी त्यांनी सांगितले, की कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती यांसारख्या शहरांमध्ये अवयव प्रत्यारोपण समित्या कार्यरत आहेत. सध्या केवळ १० टक्के अवयवदान उपलब्ध होते. त्यामुळे या मोहिमेची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातही जनजागृती आणि समुपदेशन आवश्यक आहे. यासोबतच रुग्णालयांनीदेखील यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे त्यांनी कौतुक केले.
किडनी रॅकेटसारख्या घटनांमुळे संपूर्ण प्रक्रियेवर शंका घेतली जाते, मात्र सर्वजण दोषी नसतात. त्यामुळे नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी प्रत्येक अवयवदात्याची कहाणी समोर आणणे गरजेचे आहे. १५ ऑगस्टसारख्या महत्त्वाच्या दिवशी त्यांचा सत्कार व्हावा, असेही आबिटकर यांनी सूचित केले.
या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर, अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष एस. के. माथुर, समितीचे जनरल सेक्रेटरी डॉ. भरत शहा, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सन्मान केला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुनंदा वासुदेव परब यांनी एका वर्षापूर्वी आपल्या ३४ वर्षीय सुनेचे अवयवदान केले. एका वर्षापूर्वी जुलै महिन्यात सई दीपक परब या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. कंबरदुखीच्या समस्येवर तिचे पती तिला कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. संपूर्ण तपासणीत तिला बरेचसे सहव्याधी असल्याचे समजले. तिच्या पतीने तिला दुसऱ्या दिवशी दिवशी केईएम रुग्णालयात नेले. दरम्यान, तिथे दाखल केल्यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तिला मेंदूमृत घोषित केले. त्यानंतर आम्ही तिच्या कुटुंबाशी बोलून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला, असे सासू सुनंदा परब यांनी सांगितले. तिचे अवयव दुसऱ्यांना आयुष्य देणार आहे, या विचारांनी आम्ही तिचे अवयवदान केले. हे सांगताना सुनंदा यांचे डोळे पाणावले होते.
एका वर्षापूर्वी ५० वर्षीय जितेन शाह यांना ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांच्या अख्ख्या कुटुंबाने त्यांचे अवयवदान केले. ११ महिने आपल्या मोठ्या दिराला जाऊन झाले तरी दुःख हृदयात साठवून शाह कुटुंबीयांनी इतरांना नवे जीवन मिळेल या विचारातून अवयवदान केले. लोकांनी अवयवदानाबदल समजून घेतले पाहिजे, असे त्यांची लहान भावजय प्रीती शाह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com