अतिधोकादायक सेस इमारतीमधील रहिवाशांना मिळणार भाडे

अतिधोकादायक सेस इमारतीमधील रहिवाशांना मिळणार भाडे
Published on

अतिधोकादायक सेस इमारतींमधील रहिवाशांना मिळणार भाडे
अपुऱ्या संक्रमण शिबिरावर म्हाडाचा उतारा; २० हजार रुपये भाड्याचा प्रस्ताव; मंजुरी मिळताच तत्काळ अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : म्हाडाने मुंबई शहरातील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींमधील रहिवाशांसाठी खूशखबर आहे. संबंधित इमारत अतिधोकादायक झाल्याने ती रिकामी करावी लागणार आहे. मात्र म्हाडाकडे आधीच संक्रमण सदनिकांची अपुरी संख्या असून, अनेक रहिवासी संक्रमण शिबिरात जाण्यास इच्छुक नसतात. अशा रहिवासी-भाडेकरूंना मासिक २० हजार रुपये भाडे देण्याचा म्हाडाचा विचार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरात जाण्यास इच्छुक नसलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत शहरात सध्या आठ-दहा दशकांपूर्वी उभारलेल्या १३ हजारहून अधिक उपकरप्राप्त इमारती आहेत. यापैकी अनेक इमारती जुन्या झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवासी-भाडेकरूंचे संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जाते. त्यासाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी ३४ संक्रमण शिबिरे असून, त्यामध्ये २० हजार सदनिका (गाळे) आहेत. दरम्यान, म्हाडाने पावसाळ्यापूर्वी ५५० हून अधिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असून, त्यामध्ये ९६ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारतींमध्ये २,५७७ निवासी आणि ५८५ अनिवासी असे एकूण ३,१६२ रहिवासी आहेत. त्यापैकी २,५७७ रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे. मात्र म्हाडाकडे सध्या केवळ ७०० ते ७५० संक्रमण शिबिरांचे गाळे उपलब्ध असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे उर्वरित रहिवाशांना संक्रमण शिबिर उपलब्ध करून देता आले नाही तर त्यांना दर महिन्याला २० हजार रुपये भाडे दिले जावे, असा प्रस्ताव मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने प्राधिकरणाला दिला आहे. त्याचा संक्रमण शिबिरात जाण्यास इच्छुक नसलेल्या रहिवाशांना मोठा लाभ होणार आहे.

इमारती रिकाम्या करण्यास चालना मिळणार
सध्या म्हाडाची मुंबईत ठिकठिकाणी संक्रमण शिबिरे उपलब्ध असली तरी त्याची स्थिती बिकट आहे. त्यामुळे उपकरप्राप्त इमारती धोकादायक झाल्यानंतरही रहिवासी संक्रमण शिबिरात जाण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे मुलांची शाळा, वैद्यकीय अशी वेगवेगळी कारणे पुढे करून रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता ज्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात जाण्याची इच्छा नसेल त्यांना भाडे मिळणार आहे. त्यामुळे अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास चालना मिळणार आहे.

अतिधोकादायक इमारतींचा आकडा वाढणार
मुंबईत सध्या १३ हजार सेस इमारती आहेत. त्यांचे म्हाडाकडून वर्षभरात स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्यामुळे वरून सुस्थितीत दिसणाऱ्या पण आतून जीर्ण झालेल्या आणखी अतिधोकादायक इमारती समोर येऊ शकणार आहेत. त्यामुळे संबंधित इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण सदनिका कुठून आणणार, असा प्रश्न म्हाडासमोर उभा राहणार होता. मात्र म्हाडाने आता भाड्याचा पर्याय पुढे आणल्याने हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
-------
- उपकरप्राप्त इमारती - १३ हजार
- संक्रमण सदनिका - २० हजार
- रिकाम्या संक्रमण सदनिका - ७५०
- ९६ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवासी - २५७७
- रहिवाशाला प्रतिमहिना २० हजार रुपये भाडे देण्याचा प्रस्ताव
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com