

निवृत्त उपायुक्तांच्या कुटुंबाची
परदेशी सहलीच्या बहाण्याने फसवणूक
मुंबई, ता. ३१ ः मुंबई गुन्हे शाखेतून निवृत्त झालेल्या पोलिस उपायुक्तांच्या कुटुंबाची ट्रॅव्हल एजन्सीने आर्थिक फसवणूक केली आहे. बँकॉकला पोहोचल्यावर निवाऱ्याची व्यवस्था आणि परतीचे तिकीट एजन्सीने कॅन्सल केल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेच, मात्र सहलीच्या उत्साहावर विरजण पडले, असे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निवृत्त उपायुक्तांनी दिलेल्या तक्रारीआधारे एमएचबी कॉलनी पोलिसांनी संबंधित ट्रॅव्हल एजन्सी चालविणाऱ्या अखिलेश सिंग या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्त उपायुक्तांचा मुलगा, सून आणि नातवंडांनी उन्हाळी सुट्टीत बँकॉक, थायलंड येथे सहलीसाठी जाण्याचे ठरवले. केनिल ट्रॅव्हल एजन्सीकडे त्यांनी या देशांतील पॅकेजबाबत चौकशी केली. तेव्हा एजन्सी चालक अखिलेश सिंग याने चार जणांची जाण्या-येण्याची विमान तिकिटे आणि सात दिवसांच्या निवाऱ्याची व्यवस्था दोन लाख रुपयांत करून दिली जाईल, असे सांगितले.
हे पॅकेज पसंत पडल्याने त्यांनी सिंगद्वारे बुकिंग करण्याचे ठरवले. त्यासाठी सिंग याने सर्व रक्कम आगाऊ द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार त्याला ही रक्कम आगाऊ दिली गेली. त्यानंतर त्याने विमान तिकिटे आणि हॉटेलमधील निवाऱ्याचे बुकिंग केल्याबाबतची कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवली.
ठरल्याप्रमाणे हे कुटुंब १७ मे रोजी बँकॉक येथे पोचले आणि सिंगने बुक केलेल्या हॉटेलवर गेले. तेथे सिंग याने दिलेले कन्फर्मेशन लेटर व्यवस्थापकाला दाखवले. व्यवस्थापकाने खातरजमा केली तेव्हा या चौघांच्या नावे येथे कोणतेही बुकिंग नव्हते. तेव्हा कुटुंबाने सिंगशी संपर्क साधून बुकिंग नसल्याबद्दल सांगितले. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या कुटुंबाने परतीची तिकिटे ऑनलाइन तपासली. तीही कॅन्सल केल्याचे दिसले. त्यामुळे बँकॉकला गेल्या गेल्या या कुटुंबाला पदरमोड करून निवाऱ्याची आणि परतीच्या तिकिटांची व्यवस्था करावी लागली, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.