

सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून पागडी इमारतींची नोंदणी होणार
स्वयंपुनर्विकास मार्गी लागेल ः दरेकर
मुंबई, ता. ३१ ः दक्षिण मुंबईतील पागडी इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, त्यासाठी त्यांची नोंदणी सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून केली जाईल, अशी हमी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी येथे दिले.
रूपेश फाउंडेशन आणि मुंबई बँकेतर्फे डोंगरी येथे आयोजित केलेल्या स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिरात दरेकर बोलत होते. या वेळी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक विठ्ठल भोसले, मुंबई जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे, आर्किटेक्ट हर्षद मोरे, मुंबई सहकारी बोर्डाचे सहसचिव श्रीधर जगताप, आयोजक रूपेश पाटील, प्रिया पाटील, प्रवीण ठाकूर, अमोल खरात आदी उपस्थित होते.
या वेळी दरेकर म्हणाले, की दक्षिण मुंबईत पागडीच्या जागा तसेच गिरगावात सेस इमारती आहेत. यातील पागडीच्या जागांसाठी अनेक अडचणी आहेत, काही बेनामी मालमत्ता आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झालेली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पागडी इमारतींना गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी करण्यास परवानगी दिली जाईल. आवश्यकता असली तर कायद्यातही बदल करू आणि त्यातून दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल.
स्वयंपुनर्विकास अहवाल लवकरच सादर होणार
मुंबई बँकेप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही स्वयंपुनर्विकासाचे धोरण आणले आहे. मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींना तेही कर्ज देत आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही स्वयंपुनर्विकास वेग घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मनिर्भर भारत करण्याचा उद्देश आहे. तसेच, गृहनिर्माण क्षेत्रही स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होत आहे. विकसकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. स्वयंपुनर्विकासाबाबतच्या आमच्या अभ्यासगटाचा अहवाल १०-१५ दिवसांत शासनाला सादर केला जाईल. शासन त्यावर कार्यवाही करेल, असेही दरेकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.