अनावश्यक शस्त्रक्रिया केल्यास कारवाई

अनावश्यक शस्त्रक्रिया केल्यास कारवाई
Published on

अनावश्यक शस्त्रक्रिया केल्यास कारवाई
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून आरोग्यमंत्र्यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्यातील काही रुग्णालयांमध्ये महिलांवर अनावश्यक आणि अवैधरीत्या गर्भाशय शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्याची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही रुग्णालयाने शासकीय नियमावलीबाहेर जाऊन गर्भाशयाची शस्त्रक्रिया केल्यास हयगय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याने विधान परिषद सदस्या चित्रा वाघ यांच्या मागणीवरून मंत्रालयात आरोग्य विभागाची बैठक झाली. या वेळी आबिटकर यांनी यासंदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले. गर्भलिंग निदान व प्रतिबंधक कायद्यांतर्गत सर्व खासगी रुग्णालयांकडून दरमहा अहवाल घेण्यात यावा आणि गर्भाशय शस्त्रक्रियांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. महिलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कदापि माफ केले जाणार नाही. अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रियांमुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे या प्रकारांवर आळा घालण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आबिटकर यांनी सांगितले. या वेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, चित्रा वाघ, आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---
शहानिशा करूनच परवानगी
शस्त्रक्रियांसंदर्भात शासकीय कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास ग्रामीण रुग्णालय तसेच वैद्यकीय अधीक्षकांनी शहानिशा करूनच परवानगी द्यावी, असेही निर्देश आबिटकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com