मुंबईच्या हवेतील धुळीची पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक

मुंबईच्या हवेतील धुळीची पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक

Published on

मुंबईच्या हवेतील धुळीची पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक
पिएम १० चे प्रमाण वाढले; फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ५५ टक्के दिवस प्रदूषण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : यावर्षी फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान ८९ पैकी ४९ दिवस मुंबईच्या हवेतील पीएम १० ची पातळी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांपेक्षा जास्त होती. म्हणजेच एकूण कालावधीमध्ये ५५ टक्के दिवस हवेची गुणवत्ता पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक होती, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीच्या विश्लेषणातून दिसून आली. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लीन एअर’ या संस्थेने या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.
संस्थेच्या विश्लेषणानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये पीएम१०ची मासिक सरासरी पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा कायम अधिक होती, तर एप्रिलमध्ये यात सुधारणा झाली होती. या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात सर्वच्या सर्व २८ दिवसांमध्ये पीएम१०च्या पातळीने राष्ट्रीय मानकांच्या निर्धारित पातळीचे उल्लंघन झाले, तर मार्च महिन्यात ३१ पैकी १७ दिवसांमध्ये आणि एप्रिल महिन्यात ३० पैकी चार दिवसांमध्ये उल्लंघन झाले.
मुंबईतील हवा गुणवत्तेच्या नोंदी ३० कंटिन्युअस अँबिएंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सद्वारे केले जाते. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये पीएम-१० ची मासिक सरासरी पातळी अनुक्रमे १३० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, १०८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि ७८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदवण्यात आली. दरम्यान, या काळात पीएम २.५ ची पातळी निर्धारित मानक मर्यादेत राहिली होती.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लीन एअर येथील विश्लेषक मनोज कुमार म्हणाले की, मुंबईतील प्रत्येक प्रदूषणग्रस्त भागाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रस्तावित एअरवाइझ प्रणालीसह प्रत्यक्ष वेळेत स्रोताचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, म्हणजे वाहतूक, उद्योग, बांधकाम की कचरा जाळणे यापैकी नेमके कशामुळे प्रदूषण होत आहे, हे ओळखता येईल. त्याचप्रमाणे, ठोस उपाययोजना प्रभावीपणे राबवता येतील, असे त्‍यांनी सांगितले.
वातावरण संस्थेचे संस्थापक आणि मुंबई क्लीन एअर नेटवर्कचे सदस्य भगवान केसभट याविषयी म्हणाले की, मुंबईतील खालवणारी हवेची गुणवत्ता ही सगळ्यांसाठीच चिंतेची बाब झाली आहे. पीएम २.५ मुळे आरोग्याला गंभीर धोका असतोच, पण अनेक भागांमध्ये पीएम १० च्या सतत असलेल्या उच्च स्तराकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचा थेट परिणाम श्वसनाच्या आरोग्यावर होतो. बांधकामांमुळे उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने काही पावले उचलली आहेत, पण या हिवाळ्यात नागरिकांसाठी स्वच्छ हवा मिळावी यासाठी प्रत्यक्षात अजून बरीच कामे करणे गरजेचे आहे, असे ते म्‍हणाले.

आरोग्‍याला धोका
हवेमध्ये आढळणारे घन आणि द्रव कण हे इतके सूक्ष्म असतात की ते सहज फुप्फुसांपर्यंत पोहोचू शकतात आणि श्वसन व हृदयविकारासारख्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यावरील धूळ, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, औद्योगिक क्रिया आणि कचरा जाळणे, हे पीएम १० चे मुख्य स्रोत आहे. या कणांमुळे डोळ्यांमध्ये, घशात आणि नाकात खवखव निर्माण होते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा किंवा फुप्फुसविकार असलेल्या व्यक्तींना अधिक धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com