‘सेन्सेक्स’ची ६७७ अंशांनी उसळी

‘सेन्सेक्स’ची ६७७ अंशांनी उसळी
Published on

‘सेन्सेक्स’ची ६७७ अंशांनी उसळी


मुंबई, ता. १६ : आखातातील तणाव, जागतिक शेअर बाजारातील संथ कल यांच्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी आयटी शेअरमध्ये मोठी खरेदी केल्यामुळे गेल्या दोन दिवसांची घसरण थांबवताना सोमवारी (ता.१६) भारतीय शेअर बाजार निर्देशांक एक टक्क्याच्या आसपास वाढले. आज ६७७.५५ अंशांनी उसळलेला ‘सेन्सेक्स’ ८१,७९६.१५ अंशावर बंद झाला, तर २२७.९० अंशांनी वाढलेला ‘निफ्टी’ २४,९४६.५० अंशांवर बंद झाला. आज आयटी क्षेत्राचे शेअर सर्वांत जास्त वाढले. टेक महिंद्र दोन टक्क्यांपेक्षा जास्त, एचसीएल टेक दीड टक्क्यांपेक्षा जास्त तर टीसीएस आणि इन्फोसिस दीड टक्क्यांच्या आसपास वाढले. त्यामुळे निर्देशांकांत भरीव वाढ झाली.

जागतिक तणाव कायम असूनही आज बड्या शेअरच्या किमतीत वाढ झाली. आखातातील तणावाचा परिणाम अल्पकालीन असण्याची खात्री सर्वांना आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदार दीर्घकालीन परिस्थितीवर भर देत आहेत, असे विनोद नायर यांनी सांगितले. आज बँका, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, ग्राहकोपयोगी वस्तू, धातूनिर्मिती, बांधकाम व्यवसाय, ऑइल अँड गॅस ही क्षेत्रे अर्धा ते एक टक्का वाढली. जग्वार लँड रोव्हरच्या संथ कामगिरीमुळे टाटा मोटर्सचा शेअर घसरला, तर कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने बीपीसीएल, एचपीसीएल आदी कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले. मूल्यांकन जास्त झाल्यामुळे माझगाव डॉक सहित अन्य संरक्षण कंपन्यांचे शेअर आज घसरले.
आज ‘सेन्सेक्स’मध्ये टाटा मोटर्स साडेतीन टक्के घसरला, तर अदाणी पोर्ट आणि सन फार्मा किरकोळ घसरले. दुसरीकडे आयटी शेअरखेरीज एशियन पेंट, टाटा स्टील, कोटक बँक, एटरनल, लार्सन अँड टूब्रो, आयटीसी, मारुती, एअरटेल या शेअरचे भावही एक टक्क्याच्या आसपास वाढले.

जागतिक घटना तसेच देशांतर्गत आर्थिक स्थितीवर गुंतवणूकदार लक्ष ठेवून राहतील, तर आखातातील तणावामुळे संरक्षण आणि तेल कंपन्यांच्या शेअरवर परिणाम होईल. चांगल्या पावसामुळे कृषी क्षेत्राशी संबंधित शेअरवरही सर्वांचे लक्ष राहील.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com