शाळांमध्ये बालगोपालांचे स्वागत

शाळांमध्ये बालगोपालांचे स्वागत
Published on

शाळांमध्ये बालगोपालांचे स्वागत
नव्याकोरे गणवेश, पाठ्यपुस्तकांनी विद्यार्थी भारावले
सकाळ वृतसेवा
मुंबई, ता. १६ ः विदर्भवगळता राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक शाळेमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या बालकांसाठी वर्गखोल्यांमध्ये खास सजावट, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रिमझिम पावसात ढोलताशांसह स्थानिक बँड पथक, लेझीम नृत्य तसेच पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील दुर्वेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत प्रवेशोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, पुष्प, खाऊ देत त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यासोबत येथील शाळा परिसरात वृक्षरोपण करून पर्यावरणाची कास धरीत हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचा त्यांनी संदेश दिला. उपमुख्यमंत्री ‍अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. या वेळी त्‍यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बागलाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला. शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वांद्रे (पूर्व) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर दुपारी वर्धा जिल्ह्यातील करंजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतही जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
--
नवीन कोरी पुस्तके हाती
यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिलीचा अभ्यासक्रम बदलला असल्याने या वर्गातील नवी कोरी पुस्तके राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांसह अनुदानित अशा शाळांतील विद्यार्थ्यांच्या हाती पडली. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात आल्याने पहिला दिवस स्वागत, नवी कोरी पुस्तके आणि सरकारी शाळांतील गणवेशाने मुले भारावून गेल्याचे चित्र राज्यभरातील शाळांमध्ये दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com