

पावसाने महामुंबईला दिवसभर झोडपले
आजही मुसळधारेचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा वाढलेला जोर सोमवारीही कायम राहिला. पावसाने दिवसभर महामुंबईला चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे बऱ्याच सखल भागांत पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसला. रेल्वेसेवाही विलंबाने सुरू होती. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, रायगडच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
शाळेचा पहिला दिवस असल्याने आज शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाने संपूर्ण रात्रभर शहर आणि उपनगरांना झोडपून काढले. रविवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यादरम्यान शहर ९५, पूर्व उपनगरे ५८, तर पश्चिम उपनगरांत ७५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर सोमवारीही दिवसभर काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार सरी सुरूच होत्या. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांची चांगलीच धावपळ झाली. अंधेरी, सायन, गांधी मार्केट, भांडुप, घाटकोपर एलबीएस मार्ग, चेंबूर शेल कॉलनीमध्ये पाणी साचले. मानखुर्द, पवई, दादर टीटी, वांद्रे, धारावी, चुनाभट्टी, कुर्ला परिसरात ही काही काळ पाणी साचले होते. दरम्यान, कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरांत आकाश सामान्यतः ढगाळ राहून जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
...
पावसामुळे पडझड
दिवसभरात शहरात दोन व पूर्व उपनगरांत एक अशा एकूण तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३६ ठिकाणी फांद्या व झाडे पडली. यामध्ये अंधेरी पूर्वेत ताकपाडा या ठिकाणी झाड पडून एक जण जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर आहे. संपूर्ण मुंबईत आठ ठिकाणी घरांचा व इमारतीचा भाग, भिंत पडण्याच्या घटना घडल्या. जोगेश्वरी पूर्व येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परांचीचा काही भाग पडून दोन महिला जखमी झाल्या. उपचारार्थ त्यांना एचबीटी ट्रॉमा केअरमध्ये दाखल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.