मुंबई, ठाण्यात हिंदी शाळांचे मोठे जाळे

मुंबई, ठाण्यात हिंदी शाळांचे मोठे जाळे

Published on

मुंबई, ठाण्यात हिंदी शाळांचे मोठे जाळे
मुंबई महानगरात सर्वाधिक प्रमाण; मराठी शाळांची अवस्था दयनीय
मुंबई, ता. २२ ः चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी भाषा ही तिसऱ्या भाषेच्या रूपामध्ये शिकवणे अनिवार्य केले आहे. त्यावरून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या असतानाच मुंबई, ठाण्यात हिंदीच्या शाळांचे मोठे जाळे विस्तारले आहे. दुसरीकडे, मराठी माध्यमांच्या आणि विशेषत: राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत चालली आहे.
यंदाच्याच शैक्षणिक वर्षात मुंबईतील मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळांपैकी दीडशेहून अधिक शाळांनी मराठी माध्यमांच्या शाळा बंद करून त्या ठिकाणी स्वयंअर्थसहाय्यितच्या इंग्रजी आणि इतर मंडळांच्या शाळा सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव सादर केले आहेत. तर दादरसह उपनगरातील अनेक शाळांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षांत मराठी माध्यमांच्या पूर्व प्राथमिक आणि पहिलीतील तर काही शाळांनी सहावीतील प्रवेश होऊ दिले नसल्याने त्या शाळा पुढील वर्षात पटसंख्या नसल्याने आपोआप बंद होतील. त्‍यामुळे तिथे इंग्रजी अथवा इतर माध्यमांच्या शाळा सुरू होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई आणि ठाण्यातच हिंदी माध्यमांच्या आणि सरकारकडे नोंद असलेल्या ९१० शाळा कार्यरत आहेत. यात हिंदीच्या नावाने अल्पसंख्याक दर्जा घेतलेल्या आणि इतर मंडळांच्या शाळांची संख्या याहून अधिक असल्याने हिंदी माध्यमांच्या शाळांची संख्या खूप असल्याचे शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

मुंबई शहर १२२, उपनगरांत ३५२ शाळा
हिंदी माध्यमाच्या सर्वाधिक शाळा मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अशा एकूण ९१० शाळा सुरू आहेत. मुंबई उपनगरात तब्बल ३५२ आणि मुंबई शहरात १२२ शाळा कार्यरत आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ३२०, पालघर जिल्ह्यामध्ये ११६ शाळा अशा एकूण ९१० शाळा मुंबई महानगर क्षेत्रात सुरू आहेत.

राज्यभरात १,६०० शाळा
राज्यभरात हिंदी माध्यमांच्या शाळांची संख्या एक हजार ६०० इतकी आहे. या शाळांमध्ये चार लाख दोन हजार ७०६ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असून यासाठी १३ हजार ३१३ शिक्षक कार्यरत आहेत.

या जिल्‍ह्यांत सर्वाधिक कमी प्रमाण
राज्यात हिंदी माध्यमाच्या सर्वात कमी शाळा अहमदनगर, धुळे, कोल्हापूर या जिल्ह्यांत केवळ प्रत्येकी दोन शाळा आहेत. त्यानंतर सोलापूर, वाशिम, नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी चार शाळा आणि रायगड जिल्ह्यात केवळ पाच शाळा आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ सात शाळा असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर ३५, अमरावती २६, गडचिरोली २४, अकोला १५, वर्धा १४ आणि यवतमाळ जिल्ह्यात १५ शाळा सुरू आहेत.

मराठी शाळांच्या पटसंख्येचा मोठा प्रश्न
मुंबई आणि ठाण्यात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांची दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शाळा संकटात सापडल्या आहेत. यात मुंबईसारख्या शहरात तब्बल ४६ शाळांमध्ये केवळ एक ते दहा विद्यार्थ्यांची पटसंख्या उरली असल्याने या शाळांमध्ये सुधारणा न झाल्यास येत्या शैक्षणिक वर्षात टाळे लागण्याची शक्यता आहे. अशीच काही अंशाने स्थिती ठाणे जिल्ह्यातील २३५, पालघर जिल्ह्यातील २९९ रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक अशा एक हजार २४१ शाळांचीही बनली आहे.

मराठी विद्यार्थ्यांचा मार्ग बंद
मुंबईत मागील वर्षापर्यंत भाषिक, धार्मिक आदी स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळवलेल्या ४८१ कनिष्ठ महाविद्यालये मुंबईत कार्यरत आहेत. यातील बहुतांश महाविद्यालये काही वर्षांपूर्वी अनुदानित होती. या महाविद्यालयांनी अल्पसंख्याक दर्जा घेतल्याने सर्वसामान्य मराठी विद्यार्थ्यांचे गुणवत्तेनुसार प्रवेशाचा मार्ग बंद झाला. येत्या काळात अल्पंसख्याक महाविद्यालयांची संख्या वाढल्‍यास मुंबईत सर्वसामान्य मराठी विद्यार्थ्यांच्या हक्कांची महाविद्यालये या शाळांप्रमाणेच बंद होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अल्पसंख्याकची संख्या अधिक
मुंबई आणि परिसरात कार्यरत धार्मिक अल्पसंख्याक दर्जा असलेल्यांमध्ये ख्रिश्चन, रोम कॅथलिकची ५५, जैन चार, मुस्लिम ७०, पारशी तीन, शिख नऊ, बुद्धिस्ट पाच अशी १४६ महाविद्यालये आहेत. तर भाषिकमध्ये गुजराती ७१, हिंदी १४४, कन्नडा १६, कोकणी एक, मल्याळम् १६, मारवाडी एक, पंजाबी नऊ, सिंधी ३४, तमिळ १४, तेलुगू दोन, उर्दू सहा अशी एकूण ३१४ महाविद्यालये भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालये कार्यरत आहेत. तर यंदाच्या शैक्षणिक वर्षात यात आणखी काही महाविद्यालयांची भर पडणार असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई महानगरातील
हिंदी माध्यमाच्या शाळा
- मुंबई उपनगर - ३५२
- मुंबई शहर - १२२
- ठाणे - ३२०
- पालघर - ११६
एकूण - ९१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com