युवासेनेवर पालिका निवडणुकीची जबाबदारी
युवासेनेवर पालिका निवडणुकीची जबाबदारी
ठाकरेंना मुंबईत चेकमेट देण्याची शिंदेंची रणनीती
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना (शिंदे) कामाला लागली आहे. पक्षात जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, याची सर्वस्वी जबाबदारी युवासेनेच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
पुढील ४ ते ६ महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. पक्षांच्या बैठका सुरू असून, निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखणे सुरू झाले आहे. २५ वर्षे मुंबई महापालिका आपल्या हातात ठेवणाऱ्या शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उद्धव ठाकरे आपला गड राखण्यात यशस्वी होतील की एकनाथ शिंदे बाजी मारतील याबद्दल उत्सुकता आहे. तसे बघायला गेलो तर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षाचे दोन्ही गट कामाला लागले आहेत.
शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष कामाला लागला आहे. मुंबईतील जास्तीत जास्त तरुणांना आकर्षित करून पक्षात सहभागी करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यांनी याची मुख्य जबाबदारी आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना नव्या जोमाने मैदानात उतरली आहे.
लोकसभा मतदारसंघात थेट तरुणांना जोडण्यासाठी संपर्क अभियान सुरू करण्यात आले असून, याची जबाबदारी युवासेना सरचिटणीस अमेय घोले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
युवासेनेच्या माध्यमातून मुंबईत लोकसभानिहाय रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार बैठका आयोजित करण्यात येत आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात या बैठका होत आहेत. या बैठका लोकसभा संपर्क अभियानाचा एक भाग आहेत. युवासेनेचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते यांच्या मनातील भावना जाणून घेतली जात आहे.
पहिल्या टप्प्यात उत्तर मुंबई व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रांमध्ये युवा संवाद व संपर्क बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय युवासेना सरचिटणीस अमेय अरुण घोले व राहुल कनाल हे स्वतः उपस्थित राहून आढावा घेणार आहेत.
तरुणांशी संपर्क साधणार
मुंबईची जबाबदारी युवासेना सरचिटणीस अमेय घोले यांच्याकडे सोपवण्यात आली असून, तीन विधानसभा मतदारसंघासाठी एक संपर्कप्रमुख दिला जाणार आहे. प्रत्येक विधानसभेसाठी एक उपसंपर्क प्रमुखही नेमण्यात येणार असून, त्यांच्या अंतर्गत शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष काम पाहणार आहेत. याशिवाय प्रत्येक महाविद्यालयाला जोडण्यासाठी संघटक ही नेमण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधला जाणार आहे.
संपर्क अभियान राबवणार
प्रत्येक विधानसभेत किमान एक लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी महाविद्यालय आणि तरुणांचा ओढा असणाऱ्या ठिकाणी संपर्क अभियान राबवले जाणार आहे. पुढील निदान चार महिने ही काम केले जाणार असून, त्यानंतर त्याचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी अमेय घोले आणि राहुल कनाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हा अहवाल श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवला जाईल.
नवे मतदार जोडणार
शिवसेनेची मते विभागण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर शिवसेनेची मदार असलेली मराठी मतेदेखील चार ठिकाणी विभागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ मराठी मतांवर विसंबून राहता येणार नसल्याचे शिवसेना (शिंदे) गटाला वाटते. त्यामुळे त्यांनी आपला तरुण मतदार वाढवण्याची रणनीती आखली असून, त्यावर जोर देण्यात येत आहे. या संपर्क अभियानात शिंदे गटातील काही मंत्र्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यतादेखील आहे.
शिवसेनेचे मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना आज नव्या जोमाने मैदानात उतरली आहे. या बैठका लोकसभा संपर्क अभियानाचा एक भाग आहेत.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.
- अमेय घोले,
सरचिटणीस, युवासेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.