एल्फिन्स्टन पुलाचे भिजत घोंगडे!

एल्फिन्स्टन पुलाचे भिजत घोंगडे!

Published on

एल्फिन्स्टन पुलाचे भिजत घोंगडे!
बाधित इमारतींबाबत नियोजन नसतानाही पूल बंदचा खटाटोप का केला; रहिवाशांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वरळी-शिवडी कनेक्टरचा भाग म्हणून एल्फिन्स्टन येथे एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार असून, त्यासाठी येथील पूल वाहतुकीसाठी एप्रिलमध्ये बंद करण्यात येणार होता, मात्र आधी येथील बाधित इमारतींमधील रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे द्यावीत, ती कधी देणार, किती भाडे देणार, हे लेखी द्यावे म्हणून रहिवाशांनी कडाडून विरोध केल्याने एमएमआरडीएसह राज्य सरकार बॅकफूटवर गेले असून, दीड महिना झाला तरी रहिवाशांना लेखी दिलेले नाही. परिणामी नियोजनाशिवाय एमएमआरडीएने पूल बंद करण्याचा घाट का घातला, असा सवाल रहिवासी करत आहेत.
एल्फिन्स्टन येथे डबल डेकर पूल उभारला जाणार असल्याने येथील १९ इमारती बाधित होणार आहेत, मात्र एमएमआरडीएने केवळ दोन इमारती बाधित होणार असून, त्यामधील रहिवाशांना इतरत्र पर्यायी घरे दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ॲड. आशीष शेलार यांनी नवीन नियोजनानुसार केवळ दोन इमारती बाधित होणार असल्या तरी पुलाचे काम करताना इतर १७ इमारतींना धोका निर्माण होणार असल्याचे निदर्शनास आणले. तसेच कोणत्याही विकसकाची वाट न पाहता सर्व १९ इमारतींचा पुनर्विकास ३३ (९) अंतर्गत एमएमआरडीएने करून रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे द्यावीत, अशी विनंती शेलार यांनी केली. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे.
कधी घरे देणार, तोपर्यंत किती भाडे देणार याबाबत लेखी आश्‍वासन देण्याची मागणी रहिवाशांनी एमएमआरडीएकडे केली होती. त्याला दीड महिना झाला तरी अद्याप कोणतेही लेखी पत्र दिले नाही. त्यामुळे कोणतेही नियोजन नसताना एमएमआरडीए कशाच्या आधारे आम्हाला घरे रिकामी करण्यास सांगत होते, पूल बंद करत होते, असा सवाल रहिवासी करत आहेत.

पूल बंद करण्याचे काय झाले?
डबल डेकरचे काम तत्काळ सुरू करता यावे, यासाठी पोलिस आणि एमएमआरडीएने एल्फिन्स्टन पूल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मग रहिवाशांच्या मागण्यांबाबत तोडगा काढून पुढे जाणे अपेक्षित होते. तरीही प्रशासनाने तोडगा का काढला नाही, पूल बंद का केला नाही, नुसतीच वातावरणनिर्मिती का केली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

डबल डेकर पुलाच्या कामासाठी पोलिस आणि एमएमआरडीएने एल्फिन्स्टन पूल बंद करण्याची तयारी केली होती, पण बाधित रहिवाशांकडून घराबाबत लेखी देण्याची मागणी केली असता ते दिले जात नाही. यावरून नियोजनाशिवाय त्यांची उठाठेव सुरू होती, हेच स्पष्ट होत आहे.
- मूनफ ठाकूर, रहिवासी

पुलाच्या उभारणीसाठी आमचा विरोध नाही, पण आमचे काय करणार, घर कधी देणार याबाबत एमएमआरडीएने अद्याप काहीच लेखी दिलेले नाही. त्यात स्पष्टता नाही. यावरून त्यांच्याकडे रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत नियोजन नसल्याचे दिसते.
- श्रीराम पवार, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com