११ कोटींचे सोने चोरण्याचा पितापुत्राचा डाव फसला
११ कोटींचे सोने चोरण्याचा पितापुत्राचा डाव फसला
७२ तासांत गुजरातमधून आरोपींना अटक; जंगलात दडवलेले सोने हस्तगत
मुंबई, ता. २५ : सराफा क्षेत्रात गुजरातच्या नामांकित कंपनीचे सुमारे ११ किलो सोने घेऊन पसार झालेल्या कर्मचाऱ्यासह त्याच्या दोन साथीदारांना एमएचबी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. या चोरीचा कट १९ वर्षीय कर्मचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पित्याने रचल्याचे उघड झाले. या दोघांनी जुनागढ येथील मानेकवाडा जंगलात दडवलेले सोनेही जप्त करण्यात आले.
११ किलो सोने गुजरातच्या जे. पी. एक्सपोर्ट गोल्ड अँड डायमण्ड ज्वेलरी या कंपनीचे होते. कंपनीचे प्रतिनिधी अजय घागडा (वय २७) सोने घेऊन तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कनार्टक आदी राज्यांत विकून मुंबईच्या बोरिवली येथील कंपनीच्या फ्लॅटवर आले. घागडा यांच्यासोबत त्यांचा सहाय्यक जिग्नेश कुछडिया (वय १९) होता. घागडा यांची नजर चुकवून जिग्नेशने कंपनीचे सोने असलेल्या दोन पिशव्यांसह पोबारा केला. ही बाब लक्षात येताच घागडा यांनी एम. एच. बी. पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दहिसर चेकनाका ते तलासरी टोलनाका, पालघर ते वापी आणि जुनागढ येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही चित्रण लगोलग मिळवून त्याचे विश्लेषण केले. यात आरोपी जिग्नेश, त्याचे वडील नाथाभाई आणि मित्र यश ओडेदरा हे एका कारमधून राजकोटच्या दिशेने जाताना आढळले. या वाहनाचा पाठलाग करून सर्वप्रथम यश यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून जिग्नेशही तावडीत सापडला, मात्र नाथाभाई हाती लागत नव्हता. एमएचबी पोलिस पथकांनी गुजरात राज्यातील पोरबंदर, राजकोट, जामनगर, जुनागड राज्यात ठाण मांडले. तांत्रिक तपासाआधारे अखेर त्यालाही अटक केली गेली. नाथाभाई विरोधात हत्या, हाणामारीचे गुन्हे नोंद आहेत. त्यानेच मुलाच्या माध्यमातून चोरीचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे.
जंगलात दडवले ११ कोटींचे सोने
पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे लक्षात येताच नाथाभाईने जुनागढ येथील मानेकवाडा येथील जंगलात चोरलेले ११ कोटींचे सोने दडवले. पोलिसांचा ससेमिरा थंडावला की ते पुन्हा ताब्यात घ्यावे या विचाराने नाथाभाई सोने जंगलात सोडून तेथून पसार झाला. अटकेनंतर त्याने दाखवलेल्या ठिकाणावरून ११ कोटींचे सोने हस्तगत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

