गर्दी व्यवस्थापनासाठी नेत्यांची धावाधाव
गर्दी व्यवस्थापनासाठी नेत्यांची धावाधाव
वरळीतील मेळाव्याची जय्यत तयारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून शनिवारी (ता. ५) वरळी डोममध्ये विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न आयोजकांसमोर उभा राहिला असून, दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची धावाधावा सुरू आहे. मेळाव्याचे काटोकोर नियोजन केले जात आहे.
विजयी मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. शक्तिप्रदर्शनातून सरकारला आपली ताकद दाखवण्याची रणनीती दोन्ही पक्षांनी आखली आहे. यामुळे जास्तीत जास्त गर्दी आणण्याची रणनीती पक्षांकडून आखण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून समाजमाध्यमांवर जोरदार प्रसिद्धी केली जात आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानात मेळावा न घेता तो हॉलमध्ये घेतला जात आहे. जिथे हा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्या वरळी डोमची क्षमता फक्त सहा हजार लोकांची आहे. सध्या शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या मेळाव्यासाठी २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते येण्याचा अंदाज आहे. यामुळे इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले तर या गर्दीचे व्यवस्थापन करायचे कसे, याची चिंता प्रमुख नेत्यांना सतावते आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनाही मेळाव्यासाठी आमंत्रण असल्याने त्यांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. डोमच्या बाहेर मोकळ्या जागेवरदेखील कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. पावसाळी शेड आणि बसण्यासाठी अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे. बाहेरील रस्ते बंद करून तेथेदेखील कार्यकर्ते आणि लोकांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. डोमबाहेरील लोकांना नेत्यांची भाषणे ऐकता यावीत, यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनदेखील लावल्या जाणार आहेत.
...
कार्यकर्त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहोत. डोमच्या बाहेरील रस्ते बंद करून तिथेदेखील व्यवस्था करीत आहोत. लोकांना भाषण ऐकण्यासाठी मोठ्या स्क्रीनही लावणार आहोत.
- अनिल परब, आमदार, ठाकरे गट
...
मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार हे नक्की. त्यामुळे नियोजन केले जात आहे. यासाठीच आम्ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वरळी डोमला जाऊन भेट देऊन पाहणी ही केली.
- बाळा नांदगावकर, नेते, मनसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.