ठाकरे बंधूंमधील एकी निवडणुकीपर्यंत टिकेल?
ठाकरे बंधूंमधील एकी निवडणुकीपर्यंत टिकेल?
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः जवळपास दोन दशकांनंतर ठाकरे बंधू हिंदी भाषेची सक्ती मागे घेतल्याच्या विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र आले. मराठी भाषेच्या मुद्द्यावर झालेली ही एकी महानगरपालिका निवडणुकीपर्यंत टिकेल का, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
मुंबईतील वरळी डोममध्ये झालेला मेळावा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. यात शिवसेना (ठाकरे गट) व मनसे या दोन्ही पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या सभेत बोलताना ‘आम्ही आलोय ते एकत्र राहण्यासाठी, दोघे मिळून आम्ही तुम्हाला फेकून देऊ’ असे सांगत पालिका निवडणुकीत दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी मात्र युती, आघाड्या होत राहतील; मात्र मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र असल्याचे सांगितले. त्यांनी निवडणुकीत एकत्र येण्याबद्दल जरी स्पष्ट संकेत दिले नाहीत तरी एकंदरीत वातावरण व राज ठाकरे यांची देहबोली मात्र वेगळे काही सांगते.
मराठी भाषेच्या रेट्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आले. आता मराठी माणसाच्या रेट्यामुळे ठाकरे बंधूंना पालिका निवडणुका एकत्र लढवाव्या लागणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते सांगतात. या दोन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा एकत्र येण्यासाठी पक्षनेतृत्वावर दबाव असल्याचे सांगितले जाते. ज्या पद्धतीने वरळीच्या मेळाव्याचे नियोजन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित केले, त्यावरून मने जुळल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेषतः नवी मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली येथे मनसे नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने ज्या पद्धतीने कोंडी केली आहे, ते बघता दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत तर त्यांचे राजकीय खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. मनसे नेत्यांना दुसरा पर्याय स्वीकारावा लागू शकतो.
...
आघाडी एकसंध राहणार का?
वरळीच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंब एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. मनसे आणि काँग्रेस यांच्यात विचारधारेचे मोठे अंतर आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांची विचारधारा भिन्न होती. हे पक्ष कधी एकत्र येतील, असे कुणाला वाटले होेते? त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असे राजकीय विश्लेषक सांगतात. वरळीच्या मेळाव्यात काँग्रेस नेते सहभागी नव्हते. काँग्रेसचा प्रभाव मुंबईतील काही पॉकेट्समध्ये कायम आहे, याकडे शिवसेनेच्या एका नगरसेवकाने लक्ष वेधले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) मुंबईतील राजकीय अस्तित्व जेमतेम आहे. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे दोन नेते सभेत सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्यांनी हिंदुत्वाबद्दल फारसे टोकाचे बोलणे टाळल्याकडे एका शिवसेना नेत्याने लक्ष वेधले.
...
ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम
दोन ठाकरे एकत्र आल्यास त्याचे परिणाम मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे महापालिकेत होणार आहे. दोन्ही पक्षांत होत असलेली गळती आता थांबेल, असे राजकीय विश्लेषक डॉ. सुमित म्हसकर सांगतात. दुसरीकडे या एकीचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार असल्याचे सांगितले जाते. कारण विधानसभेत ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी मतदान मनसेऐवजी भाजपला गेले, त्याप्रमाणे मराठी मतामध्ये आता विभागणी न होता एकगठ्ठा मते ठाकरे बंधूंकडे जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरे म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याचा एक वेगळा संदेश जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती झाली आहे.
...
भूमिका बदलणे सोपे नाही!
दोन बंधूंमधील संभाव्य युती आताच जाहीर केली जाणार नाही. कारण ही युती तोडण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करेल. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे पत्ते फेकले जातील. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, असा इशारा राज ठाकरे यांनी या सभेत दिला. जनमताचा रेटा बघता या वेळी भूमिका बदलणे राज ठाकरे यांना सोपे नसल्याचे सांगितले जाते.
...
महानगरपालिका निवडणुका या दोघांसाठी महत्त्वाच्या आहेत. आगामी पालिका निवडणुकांत मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोघांनाही नुकसान होण्याची शक्यता आता कमी झाली आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने आघाडीच्या घटक पक्षांना सोबत ठेवतील. त्यामुळे मनसेमुळे महाविकास आघाडीला धक्का बसणार नाही.
- सुमित म्हसकर, राजकीय विश्लेषक
....
मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ एकत्र येणे हे मोठी घडामोड आहे. राजकारणापलीकडे या घटनेकडे बघितले पाहिजे.
- जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
...
पालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपला घाबरलेल्या ठाकरे सेनेला आता भाऊबंदकी आठवली आहे. महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी ही धडपड आहे. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी वरळीचा कौटुंबिक स्नेहमिलनाचा कार्यक्रम होता.
- आशीष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.