ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाने प्रादेशिक राजकारणाला गती मिळणार
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाने प्रादेशिक राजकारणाला गती मिळणार
राजकीय विश्लेषकांचा सूर
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून तब्बल १८ वर्षांनंतर राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. वरळी डोममध्ये झालेल्या विजयी सभेतील उत्साही वातावरण बघता, दोन भावंडांची भाषणे, त्यांची देहबोली बघता हे दोन्ही पक्ष राजकारणात एकत्र येतील, असे स्पष्ट संकेत आहेत. तसे झाल्यास राज्यातील कमजोर झालेल्या प्रादेशिक राजकारणाला बळ येईल आणि भाजपपुढे एक मोठे आव्हान उभे राहील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
राज व उद्धव ठाकरे एकत्र येऊन मराठीच्या मुद्द्यावर व्यापक राजकारण कसे उभे करतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील, असे शिवसेनेचे अभ्यासक संजय पाटील सांगतात. दोन भावडांनी स्थानिक स्वराज संस्था व पालिका निवडणुका एकत्र लढवल्या तर राजकीय समीकरण बदलेल; मात्र त्यासोबत महाविकास आघाडीची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठी भाषेवरून उठलेल्या या वादळात एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद कमी होईल, यावर सर्व राजकीय विश्लेषकांचे एकमत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची होईल, असे विश्लेषक सांगतात.
....
मुंबई, ठाण्यापुरता ठाकरे एकीचा परिणाम मर्यादित राहील असे दिसते. शिवसेनेच्या अस्तित्वासाठी मुंबई पालिका अत्यंत महत्त्वाची आहे. दोन भाऊ एकत्र येऊन जर मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले तर उर्वरित राज्यात ते पुन्हा मुसंडी मारू शकतात. दुसरीकडे राज ठाकरे यांच्यासाठी ही सर्वात मोठी व शेवटची संधी आहे.
- डॉ. सुमित म्हसकर, प्राध्यापक ओपी जिंदाल विद्यापीठ
...
येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये मुंबई व ठाण्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मोठा परिणाम होणार आहे. कारण ही दोन शहरे शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जातात. यानिमित्ताने मराठी भाषेसाठी अनेक वर्षांनंतर एक मोठी राजकीय चळवळ उभी राहिली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये स्थानिक भाषेचा मुद्दा जोर धरत आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे प्रादेशिक अस्मितेचे राजकारण अधिक बळकट होईल.
- डॉ. हरीश वानखेडे, प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
...
ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मराठी माणसांमध्ये एकीची भावना येईल. मुंबईत महाविकास आघाडी तशी कमजोर आहे. त्यातच एकनाथ शिंदेंची शिवसेना सोबत असल्यामुळे या वेळी मुंबई पालिका निवडणूक म्हणजे भाजपसाठी केक वॉक होता; मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपला निवडणूक सोपी राहिली नाही. काँग्रेस जर आघाडीत राहिली तर मुंबईत एक मोठी राजकीय ताकद तयार होईल.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक
...
ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई, ठाण्यात दोघांना फायदा होऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडी फुटल्यास भाजपचा अधिक फायदा होणार आहे. मोठी शहरे सोडल्यास इतर भागांत महाविकास आघाडीने भाजपला चांगले आव्हान दिले होते. ते आव्हान कमी होईल. दुसरे म्हणजे भाजपला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर नियंत्रण ठेवता येईल.
- संजय पाटील, राजकीय विश्लेषक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.