स्वार्थाचा झेंडा अन् सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला
स्वार्थाचा झेंडा अन् सत्तेचा
अजेंडा बोलून दाखवला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
पहिली ते बारावी हिंदीसक्तीचा अहवाल मान्य केल्याबद्दल मराठी माणसाची माफी मागायला हवी होती
मुंबई, ता. ५ : मराठी भाषेबद्दल राज ठाकरे यांची तळमळ दिसून आली, तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आगपाखड, द्वेष, जळजळ, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मळमळ हाेती. त्यांनी मराठीचा नाही तर स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यात पहिली ते बारावीपर्यंत हिंदीसक्तीचा अहवाल मान्य केल्याबद्दल मराठी माणसाची माफी मागतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या मंचाचा राजकीय आखाडा केला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, काही जण झेंडा नाही, अजेंडा नाही असे बोलत होते; मात्र एकाने ते पथ्य पाळले तर दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. या मेळाव्यातून मराठी माणसांची निराशा झाली, असा टाेलाही त्यांनी लगावला.
तीन वर्षांपूर्वी अन्यायाविरोधात आम्ही उठाव केला आणि दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता, तेव्हा ते आडवे झाले जे अद्याप सावरलेले नाहीत. आता कोणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करीत आहेत. धो डाला, उठेगा नहीं साला वगैरे बोलणं त्यांना शोभत नाही. यासाठी मनगटात ताकद लागते. तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, अशी बाेचरी टीका शिंदे यांनी केली.
मराठीसाठी काय केले, असे विचारणाऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की मुख्यमंत्री असताना राज्यगीताचा आम्ही निर्णय घेतला. त्याच राज्यगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ होकार दिला. आज पंतप्रधान मोदींवरदेखील टीका करण्यात आली, हे दुर्दैव आहे. यातून त्यांची वृत्ती, द्वेष आणि सत्तेसाठीची लाचारी आणि लालसा दिसून आली. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी का होत गेला याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे.
-----
विधानसभेत जनतेने
त्यांना जागा दाखवली
उद्धव ठाकरे यांनी २०१९मध्ये बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून विधानसभेत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. शिवसेनेचे ६० आमदार जिंकले, ठाकरे गटाला १०० लढून केवळ २० जागांवर विजय मिळवता आला. खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी २०१९मध्ये जनतेशी, बाळासाहेबांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी विश्वासघात केल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.