न्यायमूर्तींनी घटनात्मक प्रतिष्ठा जपावी

न्यायमूर्तींनी घटनात्मक प्रतिष्ठा जपावी

Published on

न्यायमूर्तींनी घटनात्मक प्रतिष्ठा जपावी
सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ‘न्यायमूर्तींनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. अन्य उच्च न्यायालयात अलीकडेच घडलेल्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करताना न्यायमूर्तींनी त्यांच्या पदाशी प्रामाणिक राहून घटनात्मक प्रतिष्ठा जपण्याचे आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी (ता. ५) केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी न्यायालयात वायफाय सेवांसह इतर सुविधांचे उद्‍घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे परखड मत व्यक्त केले.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, ‘न्यायमूर्तींनी घटनात्मक संस्थेची प्रतिष्ठा जपावी. त्यांनी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार, न्यायमूर्ती म्हणून घेतलेल्या शपथेनुसार आणि कायद्यानुसार काम करावे. त्यांनी असे काहीही करू नये, ज्यामुळे या उच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल. मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा अनेक वकिलांच्या आणि न्यायमूर्तींच्या समर्पणाने, कष्टाने निर्माण झाली आहे. ती कायम ठेवा, समाजाच्या गरजांनुरूप कायद्याचे आणि संविधानाचा अर्थ लावायला हवा. विशेषकरून सध्याच्या पिढीसमोरील समस्या विचारात घेऊन हा अर्थ लावणे आणि त्याची व्याख्या करणे व्यावहारिक ठरेल.’ त्याचवेळी, न्यायमूर्तींची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल याचा पुनरुच्चार करून कोणत्याही परिस्थितीत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाणार नसल्याचेही सरन्यायाधीशांनी या वेळी स्पष्ट केले.

आणि सरन्यायाधीश मराठीतून बोलले!
शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मृतिपटलाचे अनावरण आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शनिवारी (ता. ५) सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी उपस्थितांना मराठीतून संबोधित करू की इंग्रजीतून याबाबत आपण थोडे गोंधळल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले. त्यावर उपस्थितांमधून मराठीतून बोलण्यास सांगितले. त्यावर मराठीतून बोलून सगळ्यांना समजेल का, असा प्रश्न गवई यांनी केला. तसेच सध्या महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, तर मी मराठीतूनच बोलतो, असे म्हणत सरन्यायाधीशांनी भाषणाला सुरुवात केली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी
सरन्यायाधीश गवई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व व्यासंगी व बहुआयामी होते. ते एक उत्कृष्ट शिक्षक असल्याने त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी ठरली. शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असतानाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल घटकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सुरू केले. १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या ॲक्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com